नेहमीप्रमाणे उत्साहात कामावर गेलेली आणि “आज अजित पवार यांच्या फ्लाइटमध्ये ड्यूटी आहे’ असे वडिलांना अभिमानाने सांगणारी पिंकी आता कधीच परतणार नाही, या विचाराने वरळीचा सेंच्युरी मिल परिसर हळहळत आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश असून त्यांच्या जाण्याने एका जिद्दी तरुणीचा प्रवास अकाली थांबला आहे.
पिंकीचा भाऊ करण याने कंपनीच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच अशाच एका उड्डाणादरम्यान मोठा अपघात टळला होता. त्या वेळी पिंकीने वैमानिकांचा अननुभवीपणा आणि विमानातील तांत्रिक त्रुटींबाबत कुटुंबाकडे चिंता व्यक्त केली होती. खुद्द अजित पवार यांनीही त्या वेळच्या सेवेबद्दल नाराजी वर्तवली होती, अशी माहिती समोर येत आहे.
समाजसेवेचे स्वप्न अधुरे
पिंकी केवळ आपल्या करिअरचा विचार करत नव्हती. मंगळवारी रात्री भावाशी बोलताना तिने झोपडपट्टीतील गरीब आणि शोषित मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची इच्छा व्यक्त केली होती. “मी आता कमावती झाले आहे, मला या मुलांसाठी काहीतरी करायचे आहे,” हे तिचे शब्द आता केवळ आठवणीत उरले आहेत.
पिंकी वडिलांना म्हणाली होती नांदेडला जातेय..
पिंकीचे वडील शिवकुमार यांनी जड अंतःकरणाने मंगळवारच्या आठवणींना उजाळा दिला. “ती म्हणाली होती, मी नांदेडला जातेय. सकाळी बातम्या पाहिल्या आणि काळजाचा ठोका चुकला. माझ्या मुलीला मॉडेलिंगची आवड होती, पण मीच तिला एअर होस्टेस होण्याचा आग्रह केला.’
कर्तव्य बजावतानाच विदीप जाधवांचा अजित पवारांसोबत “अखेरचा निरोप’
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक तथा मुंबई पोलिस दलातील २००९ बॅचचे कॉन्स्टेबल विदीप जाधव यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच त्यांचे निधन झाल्याने पोलिस दलासह ठाणे शहरावर शोककळा पसरली आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी असलेले विदीप जाधव हे गेल्या २७ वर्षांपासून ठाण्यातील कळवा येथील विटावा सूर्यनगर परिसरात वास्तव्यास होते. ते अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्यदक्षता, शिस्तप्रियता आणि शांत स्वभाव यासाठी ते सहकाऱ्यांमध्ये परिचित होते.
अपघाताची बातमी समजताच जाधव कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, १४ वर्षांची मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. “सर्वांशी मिळूनमिसळून राहणारा, मदतीला सदैव तत्पर असलेला माणूस आम्ही गमावला,” अशा भावना त्यांच्या शेजाऱ्यांनी व्यक्त केल्या. घरातील कर्ता पुरुष अचानक हिरावून घेतल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.
एकनिष्ठ सावली हरपली: परिसरात सर्वांचे लाडके
जाधव हे केवळ एक सुरक्षा रक्षक नव्हते, तर अजित पवारांच्या सावलीसारखे वावरणारे एक विश्वासू सहकारी होते. २००९ मध्ये पोलिस दलात भरती झालेल्या जाधव यांनी आपल्या १२ वर्षांच्या सेवाकाळात अत्यंत कठीण जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. ठाण्याच्या विटावा परिसरात ते सर्वांचे लाडके ‘विदीप भाऊ’ म्हणून ओळखले जात.
शांभवी पाठक हिने घेतले होते एव्हिएशन सिक्युरिटीत प्रशिक्षण
परदेशात प्रशिक्षण घेतल्यानंतर, शांभवी पाठक भारतात परतली आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून व्यावसायिक पायलट परवाना मिळवला. त्यांनी फ्रोझनदेखील पूर्ण केले, जे एअरलाइन पायलट होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते. तिच्याकडे फ्लाइट इन्स्ट्रक्टर रेटिंगदेखील होते, ज्यामुळे ती इतरांना प्रशिक्षण देण्यास पात्र ठरली. शांभवी पाठकने सहायक फ्लाइट इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले. वैमानिकासाठी, सुरक्षा नियम समजून घेणे केवळ महत्त्वाचे नाही तर अत्यंत महत्त्वाचे आहे. शांभवीने स्पाइसजेटकडून एव्हिएशन सिक्युरिटी प्रशिक्षण घेतले. दरम्यान, या वेळी तिच्यासोबत कॅप्टन सुमित कपूर हे पायलट होते. यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.











