फलटण ते दहिवडी रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.शहराच्या हद्दीवरील खडकहिरा व कोळकी येथील बुवासाहेब मंदिराजवळील ओढ्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे; पण या कामाचा फटका नागरिकांना वाहतूक कोंडीच्या रूपाने बसत आहे. सकाळी आणि संध्याकाळी शाळा, कामगारांच्या वेळेदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
पुलाच्या बांधकामादरम्यान शेजारीच तात्पुरता पूल उभारण्यात आला आहे. खाली मोठे पाइप टाकून त्यावरून वाहतुकीसाठी अरुंद मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावरून एकावेळी मर्यादित वाहतूक होत असल्याने सकाळी शाळेच्या वेळेत तसेच सायंकाळी प्रचंड कोंडी होत आहे.
विशेषतः जुन्या गर्ल्स होस्टेल परिसरातील फलटण आरटीओ कार्यालय भागात दररोज छोटे- मोठे अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अरुंद मार्ग, धुळीचे प्रमाण आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे धोका वाढला आहे.
नागरिकांसाठी आता ‘स्मार्ट’ विचार करून पर्यायी मार्ग उपलब्ध करावेत, अशी मागणी होत आहे. कोळकी भागातून फलटण शहरात येताना अनंत मंगल कार्यालय व महाराजा मंगल कार्यालयामार्गे वळसा घेतल्यास वाहतूक टाळणे सोयीचे ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रशासनाने वाहतूक नियोजनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. विकासकामांचे स्वागत होत असले तरी सुरक्षितता आणि सुलभ वाहतूक यांची तडजोड होऊ नये, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.











