तारापूर औद्योगिक क्षेत्रातील झपाट्याने वाढलेल्या औद्योगीकरणाचा थेट फटका बोईसर परिसराला बसत असून, गेल्या अनेक वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. बोईसर व लगतच्या गावांमध्ये सध्या ५ हजारांहून अधिक अनधिकृत घरे उभी असून त्यामध्ये १०० पेक्षा अधिक दुमजली व बहुमजली इमारती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पालघर–बोईसर महानगरपालिका होण्याच्या मार्गावर असताना, शहराच्या नियोजनाला सुरुंग लावणाऱ्या या अनधिकृत बांधकामांकडे महसूल विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे, राजकीय पक्षांकडून अशा बांधकामांना आश्रय दिला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
औद्योगीकरणानंतर चाळ संस्कृतीचा उदय
१९९० च्या दशकात तारापूर औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार झाला. यानंतर विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी राहण्याची सोय म्हणून बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात चाळी उभारण्यात आल्या.
या चाळींपैकी बहुतांश बांधकामे महसूल विभागाच्या जमिनीवर तसेच नवीन शर्तीच्या जमिनीवर उभी राहिली असून, त्यांना कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही.
शासकीय व वनजमिनींवर थेट अतिक्रमण
गंभीर बाब म्हणजे, गुरुचरण जमीन, वन विभागाच्या हद्दीतील जमीन तसेच इतर शासकीय जागांवर थेट अतिक्रमण करून वसाहती उभ्या करण्यात आल्या आहेत.
या इमारतींना —
बांधकाम परवाना नाही
भोगवटा प्रमाणपत्र (OC) नाही
अग्निसुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही तरतूद नाही
अनेक इमारतींमध्ये मार्जिन स्पेस न ठेवता, अत्यंत धोकादायक पद्धतीने बांधकाम करण्यात आले असून, भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण झाला आहे.
कारवाई झाली, पण पुन्हा अतिक्रमण
महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. मात्र,
कारवाई अर्धवट राहिली
स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले
पुन्हा त्याच ठिकाणी नवीन बांधकामे उभी राहिली
यामुळे महसूल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मासिक ‘हफ्ता’ संस्कृतीचा आरोप
स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप करत सांगितले की, काही स्थानिक व्यक्ती व कर्मचारी अनधिकृत घरांकडून दरमहा आर्थिक मोबदला घेत आहेत,
याच ‘हफ्ता’ व्यवस्थेमुळे बोईसर परिसरात अनधिकृत वसाहतींना पेव फुटले आहे.
महसूल विभागाचा खुलासा
या संदर्भात बोईसर मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता,
आपल्या कार्यकाळात कोणतेही नवीन अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा
जुन्या बांधकामांवर कायदेशीर मर्यादेमुळे थेट नोटीस देता येत नसल्याचे स्पष्टीकरण
अनधिकृत बांधकामांबाबत वरिष्ठ कार्यालयाला वेळोवेळी अहवाल दिल्याचा दावा असा खुलासा त्यांनी केला आहे.
अतिक्रमणाचे माहेरघर ठरलेले परिसर
बोईसर व परिसरातील खालील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन शर्तीच्या व शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे —
भीमनगर, अवध नगर, आत्मशक्ती नगर, पास्थळ, भैय्या पाडा, धनानी नगर, गणेश नगर, सरावली, यादव नगर, शिवाजीनगर (सालवड), लोखंडी पाडा, थावरपाडा, दांडी पाडा, गधा पाडा इतर अनेक ठिकाणे
नागरिकांची मागणी : तातडीची कठोर कारवाई
बोईसर महानगरपालिकेच्या दिशेने वाटचाल सुरू असताना,
अनधिकृत बांधकामांवर तातडीने बुलडोझर कारवाई
दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
राजकीय हस्तक्षेप थांबवण्याची मागणी











