April 20, 2026 12:53 am

हुंदके थांबेनात : डोळ्यांवर, कानांवर बसेना विश्वास

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामतीजवळ अपघात… ही बातमी बुधवारी सकाळी सोशल मीडियावर येवून धडकली… त्या चार ओळी वाचून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेकांनी नातेवाईक, मित्रमंडळींना फोन करुन खरेखोटे जाणण्याचा प्रयत्न केला. टीव्ही लावा न्यूज चॅनेलवालेही दाखवू लागलेत, असे एकमेकांना फोनवरुन सांगू लागले. पहिल्या बातमीत गंभीर जखमी झालेले दादा नंतरच्या बातम्यांमध्ये मृत्युमुखी पडल्याचे दाखवले गेले अन्‌‍ अवघा जिल्हा थबकला. ही दु:खद वार्ता कानोकानी पसरली अन्‌‍ जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद झाला.

प्रत्येक घरात बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे गडबड सुरु होती. मुले शाळेचे आवरण्यात तर पुरुष मंडळी, महिला वर्ग त्यांच्या-त्यांच्या कामात गुंतलेला होता. सुट्टीचा दिवस नसल्याने महिलांची सर्वांचे डबे तयार करण्याची धांदल सुरु होती. अनेक घरांतून पूजा-अर्चेचा आवाज येत होता, त्याचवेळी अनेकजण मोबाईलमध्येही गुंतलेले होते. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटसॲप पाहूनच अनेकांची दिनचर्या सुरु होते. अनेकजण गरज म्हणून आणि बहुतांश लोक टाईमपास म्हणून सकाळच्यावेळेत मोबाईल बघतात. त्याचवेळी अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची बातमी सोशल मीडियावर येवून आदळली. काहींनी ही बातमी घरात सांगितली. तुझं डोकं फिरलंय का? ज्येष्ठांचा असा धमकीवजा आवाजही काही घरांमध्ये ऐकायला मिळाला.

संकटाला तुडवून पुढे जाण्याची धमक अजितदादांमध्ये असल्याने असले किरकोळ अपघात दादांचे काहीच वाकडे करु शकत नाहीत, अशा भावनेने काहींनी आपले फोन बाजूला ठेवले. मात्र, काही वेळाने फोन खणाणू लागले. अपघात मोठा आहे आणि दादांसह विमानातील लोक गंभीररित्या जखमी आहेत, अशी बातमी येवून आदळली. मग घराघरात टीव्हीचे न्यूज चॅनेल सुरु करण्यात आले. टीव्हीवरची ती सर्व दृश्ये पाहून मात्र सातारकरांच्या काळजाचा ठोका चुकला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी दादा बुधवारी सकाळी लवकर मुंबईतून विमानाने निघाले होते, तेच विमान बारामतीमध्ये विमानतळाच्या अलीकडेच घिरट्या घालून कोसळले. विमानाचा स्फोट झाला. दोन माणसे विमानातून उडून बाहेर पडली. विमान खाली कोसळले. ही घटनाच डोळ्यांनी पाहणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांचे बाईटस दिसू लागल्यानंतर मात्र सर्वजण अस्वस्थ झाले. अजितदादांसह सहा जण या विमान अपघातात मृत्युमुखी पडल्याचे समोर आल्यानंतर मात्र अनेकांचे कंठ दाटून आले. काही बोलायला शब्दच सुचेना… जिल्ह्यातला उंबरान उंबरा बुधवारी स्तब्ध झाला.

28 जानेवारी हा काळा दिवस…

दादा… म्हणून लोक हंबरडा फोडू लागले. टीव्हीवर नेते, बारामतीमधील स्थानिक जनता जशी ओक्साबोक्सी रडत होती, तशीच साताऱ्याची दादांना काळजाच्या कप्प्यात जपणारी सामान्य माणसे हुमसून-हुमसून रडत होती. साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी बुधवार, दि. 28 जानेवारी हा काळा दिवस ठरला. या दिवसाने महाराष्ट्राचा वाघासारखा माणूस नेला. दादाला आता कुठे शोधायचं. आपलं गाऱ्हाणं कुणापुढे मांडायचं? मस्तवाल अन्‌‍ अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या तोंडावर कोण सुनावणार? पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आता कोण पुढे नेणार? दादा तुम्ही गेलात अन्‌‍ अनेक प्रश्न मागे ठेवून गेलात. आम्हाला अजून तुम्ही हवे होतात.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!