April 20, 2026 5:34 am

दिल्ली-चेन्नई 12 तासांत, ग्रीन एक्सप्रेस-वेमुळे प्रवासाचा वेळ 15 तासांनी कमी होणार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‘नव्या उत्तर-दक्षिण महामार्गामुळे दिल्ली ते चेन्नई हे अंतर तब्बल 320 किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 15 तासांनी घटणार आहे. ग्रीन एक्स्प्रेस वेवरून कारने हा प्रवास अवघ्या 12 तासांत तर ट्रकने 20 तासांत पूर्ण करता येईल’, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.

 

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजद्वारे (सीआयआय) लॉजिस्टिक्स परिषदेचे आयोजन येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे करण्यात आले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ‘नव्याने होत असलेल्या या महामार्गाचे गुजरातमधील सुरतपर्यंतचे काम पूर्ण झाले असून पुढील टप्प्यांसाठीही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

 

सध्याचा दिल्ली-चेन्नई मार्ग सुरत, मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा सोलापूरमार्गे दक्षिणेकडे जातो. मात्र, नव्या महामार्गामुळे हा प्रवास सुरत-नाशिक-अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर)-अक्कलकोट-कर्नुल असा थेट होऊन चेन्नईला पोहोचेल. हा महामार्ग कन्याकुमारी, हैदराबाद, बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांनाही जोडणार आहे. इतरही अनेक शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होत आहे. डिसेंबरपर्यंत बेंगळुरू ते चेन्नई हा प्रवास अवघ्या दोन तासांत, तर बेंगळुरू ते म्हैसूर अवघ्या तासाभरात पूर्ण होईल.

 

दिल्ली-जयपूर, दिल्ली-अमृतसर, दिल्ली-कटरा आणि श्रीनगर या मार्गांवरही वेळेत मोठी बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाचा खर्च कमी होऊन देशाचा लॉजिस्टिक्स खर्च मोठ्या प्रमाणात घटेल. लवकरच भारताचा लॉजिस्टिक्स खर्च चीनपेक्षाही कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

 

पर्यायी इंधनाच्या वापरावर भर देताना ते म्हणाले, ‘सहा महिन्यांपूर्वी हायड्रोजनवर चालणाऱ्या तीन ट्रकचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच हायड्रोजन रिफिलिंग स्टेशनही उभारले जाणार आहेत.’

 

भारत – बांग्लादेश नदी मार्ग लवकरच सुरू

भारतातून बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीसाठी प्रस्तावित असलेला जलमार्ग अवघ्या दोन ते चार दिवसांत प्रत्यक्षात येण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील हल्दिया बंदरातून बार्जद्वारे थेट ढाक्यापर्यंत कंटेनर वाहतूक सुरू होणार असून, यामुळे वाहतूक खर्चात सुमारे ५० टक्क्यांची बचत होणार आहे. हा प्रकल्प त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असून अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तो यशस्वी होत आहे.

 

या जलमार्गामुळे भारताची निर्यात केवळ बांगलादेशपुरती मर्यादित न राहता इंडोनेशिया, मलेशिया तसेच चीनसारख्या आग्नेय आशियाई देशांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. सध्या नागपूर परिसरातून जाणारी मालवाहतूक मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमार्गे कोलंबो होत ढाक्याला पोहोचते. मात्र, नव्या नदीमार्गामुळे ही वाहतूक थेट हल्दिया-ढाका अशी होणार आहे. नागपूरहून बांगलादेशला ट्रान्समिशन टॉवर्स, कापूस, ट्रॅक्टरसह विविध प्रकारचा माल निर्यात केला जातो.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!