सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजा एडवर्ड स्मारक म्हणजेच के. ई. एम. रुग्णालयातील ‘राजा एडवर्ड’ हे नाव गुलामगिरीचे प्रतीक असून ते बदलण्याची गरज असल्याची स्पष्ट भूमिका मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली. “भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाला शंभर वर्षांहून अधिक काळ गुलाम बनवणाऱ्यांची नावे आजही आपण मिरवत आहोत, ही बाब आत्मसन्मानाला धरून नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
के. ई. एम. रुग्णालयाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, के. ई. एम.चे अधिष्ठाता डॉ. संगीता रावत तसेच खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, “गुलामीचे प्रतीक असलेली नावे हटवून देशभरात स्वाभिमान दर्शवणारी नावे देण्याचा निर्णय अनेक ठिकाणी घेतला जात आहे. के. ई. एम. रुग्णालयाच्या बाबतीतही महापालिका योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास आहे.”
रुग्णसेवेत आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रह
रुग्णांना अधिकाधिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे नमूद करताना लोढा यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानस्नेही सेवा, डिजिटल आरोग्य प्रणाली तसेच सरकारच्या विविध आरोग्य योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.
‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ सज्ज
सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे यांनी सांगितले की, रुग्णालयात ‘रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (HMIS) प्रभावीपणे वापरण्यासाठी तयारी पूर्ण झाली असून लवकरच ती संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे.
के. ई. एम. रुग्णालयात सुमारे २ हजार खाटा असून दररोज ६ हजार बाह्यरुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे.
लवकरच ‘सर्व्हिस टॉवर’ उभारणी
अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी माहिती देताना सांगितले की, रुग्णालयात लवकरच ‘सर्व्हिस टॉवर’ उभारण्यात येणार असून त्यामध्ये विविध वैद्यकीय तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यामुळे रुग्णांची गैरसोय कमी होऊन उपचार अधिक जलद होतील.
“के. ई. एम.चे रुग्णांवर उपकार” – अरविंद सावंत
खासदार अरविंद सावंत यांनी के. ई. एम. रुग्णालयाच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की, “या रुग्णालयाचे लाखो रुग्णांवर उपकार आहेत. हे ऋण मान्य करायला हवे.” तसेच सरकारने के. ई. एम.सारख्या मोठ्या सार्वजनिक रुग्णालयांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.











