April 20, 2026 4:20 am

महाराष्ट्रातील मिनी गोव्यात मृत्यूचा सापळा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

देश-विदेशातील पर्यटक ांमध्ये महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हणून रायगडातील काशिद बीच प्रसिद्ध आहे. निळेशार समुद्र, शुभ्र वाळू, नारळीच्या रांगा आणि रम्य वातावरणामुळे वर्षभरात पाच लाखांहून अधिक पर्यटक काशिदला भेट देतात. मात्र, या सौंदर्यामागे दडलेला धोका अनेकांना वेळोवेळी जीवघेणा ठरत असून काशिद समुद्र आता केवळ पर्यटनस्थळ न राहता मृत्यूच्या घटनांमुळे चर्चेत येत आहे.

 

काशिद समुद्रातील पहिली नोंदवलेली दुर्घटना जुलै 1998 मध्ये घडली होती. दिल्ली येथून आलेल्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आजतागायत काशिद समुद्रात 250 हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश मृत्यू हे मद्यपान करून समुद्रस्नानासाठी उतरल्यामुळे किंवा समुद्रातील प्रवाहांचा अंदाज न घेतल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे.

 

मद्यपान, सेल्फी अन् बेफिकरी

काशिद समुद्राला बाहेरून शांत आणि आकर्षक दिसत असले तरी येथे अचानक वाढणाऱ्या लाटा, खोल पाण्याचे प्रवाह आणि वाळूखालील खड्डे हे मोठे धोके आहेत. अनेक पर्यटक मौजमजेच्या नादात, सेल्फी काढणे, खोल पाण्यात जाणे किंवा मद्यपान करून समुद्रात उतरणे असे प्रकार करतात. याच बेफिकिरीमुळे अनेकांचे प्राण जात असून त्यांच्या कुटुंबीयांवर आयुष्यभर न भरून येणारे दुःख ओढवते. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काशिद समुद्रकिनारी काशिद ग्रामपंचायतीच्या वतीने चार ते पाच ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावण्यात आले आहेत. समुद्रात उतरताना खबरदारी घ्यावी, मद्यपान करून समुद्रस्नान टाळावे, जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, खोल पाण्यात जाऊ नये, अशा सूचना या फलकांवर नमूद आहेत. मात्र, दुर्दैवाने अनेक पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करून नियम मोडत असल्याचे चित्र आहे.

 

संकटमोचक पोलिस, स्थानिक रहिवासी

अनेक वेळा पर्यटक मृत्यूच्या दारात असतानादेखील मुरुड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी, काशिद ग्रामपंचायतीकडून नियुक्त करण्यात आलेले जीवरक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या काही स्थानिकांनी प्रसंगावधान राखून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या तत्परतेमुळे अनेक दुर्घटना टळल्या असल्या, तरी प्रत्येक वेळी मदत वेळेत पोहोचेलच असे नाही, हेही वास्तव आहे.

 

अर्थकारणाला फटका

वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे काशिद समुद्रकिनाऱ्याची प्रतिमा डागाळत चालली आहे. पर्यटकांच्या हलगर्जीपणा, नियमभंग आणि बेफिकिरीमुळे ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखला जाणारा काशिद समुद्र आता धोकादायक पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. याचा फटका स्थानिक पर्यटन व्यवसाय, हॉटेल व्यावसायिक आणि परिसराच्या अर्थकारणालाही बसत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांच्याकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत असले तरी पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, ही चिंतेची बाब आहे. समुद्रस्नानाचा आनंद घेताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास क्षणाचा आनंद आयुष्यभराचा शोक ठरू शकतो, हे अनेक घटनांनी अधोरेखित केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!