इशान किशनच्या वादळापुढे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लोटांगण घालण्याची वेळ दुसऱ्या टी २० सामन्यात आली. इशानने सुरुवातीपासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला आणि प्रत्येक षटकातं धावांची बरसात केली. इशीन किशनच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताला या सामन्यात मोठा विजय मिळवता आला. न्यूझीलंडने या सामन्यात २०८ धावा केल्या होत्या. भारताने इशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या खेळींच्या जोरावर ते लिलया पेलले. भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. इशानने या सामन्यात ७६, तर सूर्याने नाबाद ८२ धावांची खेळी साकारली.
भारताची या सामन्यात वाईट सुरुवात झाली होती. भारताने दोन्ही सलामीवीर लवकर हाद झाले, त्यामुळे भारताची २ बाद ६ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर इशान किशनचे वादळ मैदानात घोंदावले. कारण इशान किशनने धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली आणि त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले. इशान किशनने यावेळी फक्त २१ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले आणि त्याने शतकाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. पण इशीन किशनचे शतक मात्र यावेळी हुकले. इशान किशनने यावेळी फक्त ३२ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७६ धावांची दिमाखदार खेळी साकारली. इशान बाद झाला तरी त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपली धमाकेदार फटकेबाजी सुरुच ठेवली.
सूर्यकुमार यादवने यावेळी जलदगतीने आपले अर्धशतक झळकावले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब त्याने करून दिले. सूर्याने यावेळी शिवम दुबेला आपल्या साथीला घेतले आणि या दोघांनीही रनरेट वाढवण्याची जबाबदारी चोख बजावली. भारताने या सामन्यात विजय साकारला. भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे, त्यामुळे भारताकडे या मालिकेत आता २-० अशी आघाडी झाली आहे.
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली. तीन षटकांत त्यांनी ४३ धावा केल्या होत्या, पण त्यानंतर दोन्ही सलामीवीर त्यांनी लगेच गमावले आणि त्यांना दुहेरी धक्के बसले. त्यानंतर राचिन रवींद्रने २६ चेंडूंत ४४ धावांची दमदार खेळी साकारली, तो बाद झाला त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने २७ चेंडूंत नाबाद ४७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे न्यूझीलंडला यावेळी २०८ धावा करता आल्या.











