कात्रज येथील माय माऊली केअर सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्यदिव्य श्रीमद् भागवत सप्ताहाची आज दिनांक २० जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सांगता झाली. सात दिवस चाललेल्या या आध्यात्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
या सप्ताहाचा शुभारंभ १४ जानेवारी, मकरसंक्रांतीच्या पवित्र मुहूर्तावर करण्यात आला होता. सुरुवातीपासूनच भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात दररोज प्रवचन, भजन, आरती आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने या प्रवचनांचा लाभ घेत होते.
या सप्ताहाचे मुख्य आकर्षण ठरले कथा प्रवक्ते शास्त्रीजी जिज्ञेशभाई जयेशभाई जोषी त्यांच्या रसाळ वाणीतील श्रीमद् भागवत कथेच्या निरूपणाने भाविक मंत्रमुग्ध झाले. भक्ती, कर्म आणि सदाचार यांचे महत्त्व त्यांनी आपल्या प्रवचनातून प्रभावीपणे मांडले.
समारोप प्रसंगी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तिमत्त्व आणि या कार्यक्रमाचे आधारस्तंभ श्री. शेठ नानजीभाई ठक्कर (ठाणावाला) तसेच कार्यक्रमाचे आयोजक विठ्ठलराव वरुडे पाटील व परिवाराच्या हस्ते विधिवत होम-हवन करण्यात आले. या वेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि मंगलमय झाले होते.
या आध्यात्मिक उपक्रमामुळे समाजात सकारात्मक विचार आणि संस्कार रुजण्यास मदत होत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आधारस्तंभ मा. शेठ नानजीभाई ठक्कर ठाणावाला ह भ प तुकाराम महाराज शास्त्री नगरसेविका रंजनाताई टिळेकर, नगरसेवक प्रतीकदादा कदम, बाळासाहेब धोका,कांतीरामजी बोऱ्हाडे पाटील, जयंतीलाल घोरपडे, महेशशेठ धूत, सौ हेमलता जैन, सौ शोभा सोलंकी, नर्मदा बेन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सांगितले की समाजात शांती सुख धार्मिक वातावरण निर्माण करणे तसेच अबाधित ठेवणे यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे असते. आमच्या परिवारात पूर्वापार धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. यावर्षी पासून नानजीभाई ठक्कर यांच्या सानिध्यामुळे या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला हेच आत्मिक समाधान मिळाले, सामाजिक कार्या बरोबरच ही आध्यात्मिक सेवा व भागवत सप्ताहाची परंपरा यापुढे कायम सुरू राहील असे आश्वस्त केले. तसेच या सप्ताहाच्या आयोजनात सहभागी व उपस्थितांचे मनपूर्वक आभार.











