May 28, 2026 11:40 pm

भोंदू खरातच्या ज्योतिषशास्त्राने यंत्रणाही चक्रावल्या

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलू समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरातने केवळ अंधश्रद्धा किंवा धार्मिक आमिषाचा वापर केला नाही, तर अंकशास्त्र (न्यूमरोलॉजी), ज्योतिषशास्त्र आणि मानवी मानसशास्त्राचा अत्यंत चलाखपणे वापर करून अनेक उच्चभ्रू, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित घरातील महिलांना आपल्या प्रभावाखाली आणले आहे.

हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचे नसून, श्रद्धा, विश्वास आणि मानवी मानसशास्त्राच्या गैरवापराचे गंभीर उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

सामान्य माणसाच्या मनोवृत्तीचा विचार केला, तर एखादी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती आपल्याला आपल्या भूतकाळातील काही अचूक घटना सांगते, आपल्या आयुष्यातील काही गुपिते उलगडून दाखवते किंवा आपल्या स्वभावाबाबत इतके अचूक बोलते की, आपण थक्क होतो. अशा वेळी त्या व्यक्तीकडे काही अद्भुत शक्ती, विशेष विद्या किंवा अलौकिक ज्ञान असल्याचा समज निर्माण होणे स्वाभाविक असते. हाच मानवी स्वभाव आणि मानसशास्त्राचा नेमका फायदा अशोक खरातने घेतल्याचे दिसून येत आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अशोक खरातकडे अंकशास्त्र आणि भविष्य, ज्योतिषशास्त्राचे सखोल ज्ञान आहे. केवळ नाव, जन्मतारीख, मूलांक, भाग्यांक किंवा राशीच्या आधारे तो समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, कौटुंबिक नातेसंबंध, मानसिक ताणतणाव, वैवाहिक आयुष्यातील अडचणी, भूतकाळातील काही घटना आणि भविष्याबाबत आत्मविश्वासाने बोलत असे. त्यामुळे समोरची व्यक्ती प्रभावित होऊन त्याच्यावर सहज विश्वास ठेवत असे. दि. १८ मार्चपासून अशोक खरात विविध तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे.

सुरुवातीला नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने त्याची चौकशी केली. त्यानंतर अहिल्यानगर पोलिस, नाशिक ग्रामीण पोलिस आणि सध्या ईडीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या अडीच महिन्यांच्या चौकशीत केवळ गुन्हेगारी बाबीच नव्हे, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावही समोर आला आहे. चौकशीदरम्यान तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्याच्या अंकशास्त्राच्या ज्ञानाचा अनुभव आल्याचे समजते.

जन्मतारीख, मूलांक आणि भाग्यांक यांच्या आधारे काही वैयक्तिक बाबींबाबत तो आत्मविश्वासाने माहिती देत असल्याने चौकशी करणारेही काही काळ चक्रावल्याची चर्चा आहे. याच प्रभावाचा वापर करून तो महिलांना आधी मानसिकदृष्ट्या जिंकत असे. कौटुंबिक वाद, वैवाहिक तणाव, करिअरमधील अडथळे, मानसिक अस्वस्थता किंवा सार्वजनिक आयुष्यातील संकटे यावर उपाय म्हणून विशेष पूजा, दोष निवारण विधी किंवा आध्यात्मिक उपचार आवश्यक असल्याचे तो सांगत असे.

काही महिलांनी त्याला गुरुस्थानी मानून वैयक्तिक आयुष्यातील गोपनीय बाबी त्याच्यासमोर मांडल्या आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा संशय आहे. अंकशास्त्र हे सर्वश्रुत शास्त्र आहे आणि त्यातील काही माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध असते. मात्र त्याचा सूक्ष्म अभ्यास करून समोरच्या व्यक्तीवर मानसिक प्रभाव निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करणे, हेच अशोक खरातचे मुख्य शस्त्र ठरल्याचे तपासातून दिसत आहे.

खरातकडे येणाऱ्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक महिला आजारी होती. तब्येत कशी सुधारेल याबद्दल त्या कुटुंबाने खरात यांच्याशी संपर्क साधला. त्यावर खरातने त्यांना मोबाईलवर रिप्लाय दिला. जीबी म्हणजे गुडबाय व पुढे २:३० असे लिहिले. महणजेच उद्या दुपारी दोन वाजून ३० मिनिटापर्यंत ज्येष्ठ नागरिक महिला मरण पावेल आणि तसेच घडले. त्यामुळे या कुटुंबाचा खरातवरचा विश्वास अजूनच दृढ झाला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!