पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या कौशल्य विकास उपक्रमातून २०२२ ते २०२६ या कालावधीत १४ हजार १८९ अनुसूचित जातीच्या युवक-युवतींनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यापैकी सुमारे ९ हजार जणांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी मिळाली आहे.
बार्टीने राज्यभर १०४ रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविले आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, डेटा ॲनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, इलेक्ट्रिक व्हेईकल, हेल्थकेअर, बँकिंग आदी क्षेत्रांचा समावेश आहे. खासगी संस्थांमध्ये महाग असणारे हे प्रशिक्षण बार्टीकडून मोफत दिले जाते. तसेच प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा ४ ते ६ हजार रुपयांचे विद्यावेतनही दिले जाते.
बार्टीच्या माहितीनुसार, २०२५-२६ या वर्षातच ७ हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, या उपक्रमासाठी गेल्या चार वर्षांत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत तयारी आणि प्लेसमेंटसाठीही मार्गदर्शन केले जाते.
महत्त्वाची आकडेवारी
– एकूण प्रशिक्षणार्थी: १४,१८९
– नोकरी मिळालेले: ४,०२२
– स्वयंरोजगार स्वीकारलेले: ४,९००
– एकूण अभ्यासक्रम: १०४
– उपक्रमावरील खर्च: सुमारे २५ कोटी रुपये
बार्टीचे कौशल्य विकास विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी सांगितले की, उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत आधुनिक कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.










