May 29, 2026 3:21 am

यवतमाळकरांना मोठा दिलासा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे जलसाठे झपाट्याने आटत चालले आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, छोटे-मोठे प्रकल्प आणि धरणे कोरडी पडू लागल्याने ग्रामीण भागात पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते.

नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण आणि तीव्र टंचाई लक्षात घेऊन दिग्रस येथील अरुणावती प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाने जारी दिले. यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जलसंपदा विभागाने तातडीने हालचाली करत अरुणावती धरणाचे तीन दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलले. या दरवाजांमधून तब्बल एक दशलक्ष घनमीटर इतका प्रचंड पाणीसाठा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हे दरवाजे सलग आठ तासांसाठी उघडे ठेवण्यात आले होते. कडक उन्हामुळे कोरडे पडलेले अरुणावती नदीचे पात्र या पाणी विसर्गामुळे पुन्हा एकदा खळाळून वाहू लागले असून, नदीकाठच्या परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे.

धरणातून सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे जिल्ह्यातील दिग्रस, आर्णी आणि घाटंजी या तीन तालुक्यांमधील नदीकाठच्या गावांना थेट फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र त्यालाही मर्यादा येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. नदी पुन्हा प्रवाही झाल्यामुळे नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, कूपनलिका आणि शासकीय पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींची जलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. उन्हाळ्याच्या या शेवटच्या आणि कठीण टप्प्यात प्रशासनाने घेतलेला हा निर्णय येथील नागरिकांसाठी ‘संजीवनी’ ठरला आहे.

जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वरच आहे. त्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रानावनातील पाण्याचे स्रोत आटल्याने वन्य जीवांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यातूनच दोन दिवसांपूर्वी माकडांच्या टोळीने पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात पाण्यासाठी बस अडविल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातून अरुणावती प्रकल्पाच्या धर्तीवर नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी सर्वत्र नागरिक करत आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!