May 29, 2026 3:22 am

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलविरोधात कोकणकरांचा जनआक्रोश

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कोकणची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (NH-66) काम वर्षानुवर्षे रखडलेले असतानाही खारपाडा येथे सुरू करण्यात आलेल्या टोल वसुलीविरोधात आता जनतेचा संयम सुटला आहे. ‘मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’च्या वतीने सोमवारी (ता.25) खारपाडा टोल नाक्यावर तीव्र ठिय्या आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसूल करू नये,असे स्पष्ट संकेत न्यायालयाने दिले आहेत. असे असतानाही पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील, काम पूर्ण नसताना खारपाडा टोल नाका सुरू कसा झाला? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. ही वसुली म्हणजे सामान्य माणसाच्या खिशावर मारलेला दरोडाच आहे, अशी भावना आता संपूर्ण कोकण पट्ट्यात निर्माण झाली.

गेल्या काही वर्षांत या महामार्गावरील खड्डे, अर्धवट उड्डाणपूल, अरुंद रस्ते आणि निकृष्ट दर्जामुळे झालेल्या अपघातांत हजारो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा रस्ते नसून मृत्यूचे सापळे बनला आहे. रस्त्याची दुरवस्था कायम असताना, प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असताना टोल मात्र वसूल केला जात असल्यामुळे जनतेमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

वर्षानुवर्षे हे काम रखडले आहे. ठेकेदार बदलले, सरकारे बदलली, मात्र कोकणकरांचे हाल संपलेले नाहीत. प्रत्येक पावसाळ्यात महामार्ग खिळखिळा होतो आणि वर्षभर टोल मात्र वसूल केला जातो, हे आता खपवून घेतले जाणार नाही. हा लढा फक्त टोल पुरता मर्यादित नसून, हा आपल्या हक्काचा, आपल्या माणसांच्या जीवाचा आणि कोकणच्या अस्मितेचा लढा आहे. असे कोकणचा शिलेदार, ‘मिशन कोकण साम्राज्य यांनी सांगितले.

या अन्यायाविरोधात आता शांत न बसता सोमवारी (ता. 25) सकाळी १० वाजता खारपाडा टोल नाक्यावर होणाऱ्या ठिय्या आंदोलनात संपूर्ण कोकणकरांनी, वाहनचालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अजय यादव ‘मिशन कोकण साम्राज्य’ आणि ‘जनआक्रोश समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.

खारपाडा टोल नाका सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावरही प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर या टोल संदर्भातील अनेक व्हिडिओ (रील) प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये महामार्गाची भीषण वास्तवता समोर आणली आहे. “काम शून्य आणि वसुलीत मात्र हायटेक? असा संतप्त सवाल केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!