कोकण किनारपट्टीवरील अभेद्य जलदूर्ग म्हणून ओळख असलेल्या मुरुड जंजिऱ्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. प्लॅनिंग करण्यापूर्वी जरा थांबा, कारण येत्या मंगळवार पासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे.पुढील तीन महिन्यांसाठी किल्ला बंद असणार आहे.
कोकण किनारपट्टीवर आजही सगळ्यात भक्कम स्थितीत असलेला किल्ला म्हणून मुरुड जंजीरा ओळखला जातो. राजपूरी खाडीच्या तोंडावर वसलेला हा किल्ला पाहणे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी असते, २२ एकरच्या बेटावर पसरलेला असून, किल्ल्याची तटबंदी ४० फूट उंच आहे. सिद्दी सरदारांनी १५ व्या ते १६ व्या शतकात या किल्ल्याची बांधणी केली. १९ बुरुज असेलेला किल्ला हा अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो. किल्ल्याची रचना अशी आहे की ज्याचे प्रवेशद्वार सहाजासहजी दिसून येत नाही.
आजही राजवाडा, दरबार हॉल मशिद आणि सैनिकांच्या निवासस्थानाचे अवशेष किल्ल्यात पहायला मिळतात. किल्ल्यावर कलाल बांगडी, चावरी आणि लांडाकासम अशा तीन मोठ्या तोफा प्रसिध्द आहेत. हा किल्ला मराठा, पोर्तुगीज, मुघल आणि सिद्दी संघर्षचा साक्षीदार राहीला आहे. मराठा साम्राज्याने हा किल्ला जिंकता यावा यासाठी अनेकदा आक्रमणे केली. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी मुरुड जवळ पद्मदूर्ग किल्याची उभारणी केली होती. त्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व मोठे आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात. ऑक्टोबर ते मे हा किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी असतो. राजपूरी आणि खोरा अशा दोन बंदरातून किल्ल्याला भेट देता येते . १५ ते २० मिनटे प्रवास होडीने अथवा बोटीने प्रवास करून इथे पोहोचता येते.
शिडाच्या बोटीने किल्ल्याला भेट देणे हा विलक्षण अनुभव असतो, वाऱ्याची दिशा आणि वेग यावर शिड नियंत्रित करून बोट चालक अतिशय कौशल्यपूण पणे पर्यटकांना किल्ल्यात घेऊन जातात. त्यामुळे शिडाच्या बोटींना पर्यटकांची विशेष पसंती मिळते. पण आता किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर थांबा कारण पुढील तीन महिन्यासाठी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जाणार आहे.
मेरीटाईम बोर्डाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्या नुसार हा किल्ला येत्या २६ मे पासून तीन महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद केला जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला हा किल्ला पून्हा एकदा खूला केला जाणे अपेक्षित आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, समुद्राला मोठी उधाणे येतात. किनारपट्टीवर वादळी वारे आणि मोठ्या लाटा उसळत असतात. त्यामुळे जलप्रवासी वाहतूक धोकादायक ठरू शकते हीबाब लक्षात घेऊन मेरीटाईम बोर्डाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. राजपूरी आणि खोरा बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या आणि इंजिनच्या बोटी उपलब्ध असतात.











