ठाण्याच्या डोंबिवली परिसरातून एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे गुप्त कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण २१ नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे.
यात दोन नायजेरिन नागरिक सराईत गुन्हेगार असून ते अनेक राज्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड आहेत. ते याठिकाणी नाव बदलून वास्तव्य करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
डोंबिवली जवळील पलावा सिटी येथील ‘लोढा डाऊनटाऊन’ या आलिशान सोसायटीत ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या २१ नायजेरियन नागरिकांमध्ये अनेकजण बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचं समोर आलं आहे. तर यात दोन मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज तस्कर असून ते विविध राज्यांच्या पोलिसांना गुंगारा देऊन याठिकाणी लपून बसले होते.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अनेक राज्यांचे पोलीस या नायजेरियन तस्करांच्या शोधात होते. मात्र, हे तस्कर पोलिसांची नजर चुकवून ठाणे जिल्ह्यातील अत्यंत सुरक्षित आणि आलिशान समजल्या जाणाऱ्या ‘लोढा डाऊनटाऊन’ सोसायटीत बनावट नावांनी आणि ओळख बदलून राहत होते. त्यांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटची पाळेमुळे अतिशय खोलवर पसरलेली आहेत.
शनिवारी पहाटेच्या सुमारास नवी मुंबई पोलीस आणि मानपाडा पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत लोढा डाऊनटाऊन परिसरात वेढा घातला. संपूर्ण सोसायटीत अचानक सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. पोलिसांचा एवढा मोठा फौजफाटा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. या संयुक्त कारवाईत पोलिसांनी संशयित फ्लॅट्सवर छापे टाकून एकूण २१ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलं.
ताब्यात घेतलेल्या २१ जणांपैकी २ आरोपी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोस्ट वॉन्टेड ड्रग तस्कर आहेत. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्सची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. तर उर्वरित काही नागरिक कोणतीही वैध कागदपत्रे नसताना भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते, अशी माहिती समोर आली आहे. हे सर्वजण ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अडकलेले असू शकतात. मुंबईत अमली पदार्थ पुरवण्यात याच टोळीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
या कारवाईनंतर सर्व २१ आरोपींना मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. हे तस्कर डोंबिवली आणि मुंबई परिसरात कोणाला ड्रग्स पुरवत होते? त्यांच्याकडे सध्या किती प्रमाणात अंमली पदार्थ सापडले? आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा कसून तपास मानपाडा पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.











