ठाणे महापालिका क्षेत्रात विहिरी पुनर्जीवित करून त्याठिकाणी पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प राबविण्यात येत असून या अंतर्गत नळपाडा, कापुरबावडी आणि माजिवाडा परिसरातील पुनर्जीवित विहिरींचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले.
या विहिरींवर अत्याधुनिक पाणी शुद्ध करणारी यंत्रणा बसविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना आता स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे.
ठाणे शहरातील वाढते नागरीकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून नळपाडा, कापुरबावडी आणि माजिवाडा परिसरातील जुन्या विहिरी पुनर्जीवित करून त्याठिकाणी पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून, सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध केला जात आहे. विहिरींच्या संरक्षणासाठी जाळ्या बसविणे, भिंतींचे मजबुतीकरण करणे तसेच नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे विहिरींतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे. या उपक्रमामुळे एप्रिल-मे महिन्यांत भासणारी तीव्र पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
४६ विहिरीं पैकी १२ विहिरीचे काम पूर्ण झाले असून दर आठवड्याला ३ ते ४ विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस आहे. हा उपक्रम पुढील काळात संपूर्ण शहरात राबविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारा हा विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम आदर्श ठरत असून, राज्यातील इतर शहरांतही अशा उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजविण्यात आल्या. तसेच काही कचरा आणि सांडपाण्यामुळे दूषित झाल्या. परिणामी, नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे आणि मिरा-भाईंदर शहरांतील ४६ विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे काम सुरू आहे. तसेच, या विहिरींवर जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.
सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पुनर्जीवित विहिरी आणि त्यावर बसविण्यात आलेली जलशुद्धीकरण यंत्रणा नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे, असे मंत्री सरनाईक म्हणाले.










