पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 39 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
याप्रकरणी यवत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीतील ओअसीस हॉटेलमध्ये सोमवारी (ता. 11) सायंकाळी साडेपाच ते पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.
धनराज शिवाजी भुरके (वय 39, रा. अंबुलगा मेन ता. निलंगा जि लातुर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर माऊली पांडुरंग जाधव, व विशाल मारुती धेंडे (रा. दोघेही उरुळी कांचन, ता. हवेली), नवाज रियाज तांबोळी (रा. यवत, ता. दौंड) असे खून करणाऱ्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी दयानंद विश्वनाथआप्पा भुरके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वरील तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धनराज भुरके हे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे चुलते दयानंद भुरके आणि मित्र अक्षय निगडे यांच्यासोबत सहजपूर फाटा येथील ओअसीस हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलच्या परमिट रूममध्ये जेवण करत असताना धनराज भुरके हे बाथरूमला जाण्यासाठी निघाले. यावेळी तिथेच शेजारच्या टेबलावर बसलेल्या व्यक्तींना त्यांचा नकळत धक्का लागला.
धक्का लागल्याच्या रागातून समोरच्या टेबलावर बसलेल्या तिघांनी धनराज भुरके यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि या तिघांनी धनराज यांना लाथाबुक्क्यांनी तसेच हॉटेलमधील खुर्चीने डोक्यावर व शरीरावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात धनराज भुरके हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी दयानंद भुरके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सापळा रचून वरील तिघांना ताब्यात घेतले. यवत पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आली असून यवत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.











