आखाती देशांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांनी इंधनाची बचत करावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर याची अंमलबजावणी सत्तापक्षातील नेते आणि सरकारच्या अधिकाऱ्यांनी करावी, असे सांगत पुण्यातील शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले.
त्यांनी थेट घोड्यावरून बसून पुणे महापालिकेत येत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना इंधन बचतीचा सल्ला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे गरजेचे बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितले. त्याविरोधात आंदोलन करताना पंतप्रधान मोदी यांची दुटप्पी भूमिका वसंत मोरे यांनी आंदोलनातून मांडली.
पेट्रोल डिझेल वाचविण्याची सुरुवात पुणे महापालिकेपासून करावी, असे सांगताना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयात येताना वाहने आणू नयेत. सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा, असा सल्ला वसंत मोरे यांनी आपल्या अनोख्या आंदोलनातून दिला. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना उपरोधिक सल्ले दिले.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या इंधन वाचवा या आवाहनाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावरून प्रतिकात्मक आंदोलन केले. ठाण्यात त्यांनी घोड्यावर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. पेट्रोल डिझेलच्या टंचाईविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावरून आंदोलन छेडले. घोड्यावरून केलेल्या आंदोलनाची ठाण्यात जोरदार चर्चा होती. यावेळी मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. आव्हाड यांनी केलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून ते ठाणे महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत त्यांनी घोड्यावर बसून प्रवास करीत सरकारविरोधी घोषणा दिल्या. मोदी सरकारचं करायचं काय, व्वा रे तेरा खेल… अशा सरकारविरोधी घोषणांनी त्यांनी लक्ष वेधले. जनतेला इंधन बचतीचा सल्ला देणारा सत्ताधारी पक्ष, त्यांचे मंत्री आमदार स्वत:च्या ताफ्यांमधल्या गाड्यांची संख्या कमी करणार आहे का? खासगी विमानांनी फिरणे बंद करणार आहे का? असे प्रश्न आव्हाड यांनी विचारले.











