पौड दि. २४ जुलै : मुळशी धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, सध्या धरण ८५ टक्के भरले आहे. वाढत्या पाण्याची आवक लक्षात घेता धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टाटा पॉवरच्या मुळशी धरण प्रशासनाने धरणातून मुळा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातून सध्या ८,१०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, शुक्रवार (२४ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून हा विसर्ग १०,००० क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अथवा धरणात पाण्याची आवक आणखी वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुळा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कोणत्याही कारणासाठी उतरू नये, पोहणे, मासेमारी किंवा इतर कोणत्याही हालचाली टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठावर ठेवलेले शेतीसाहित्य, जनावरे, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांना त्वरित सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाने स्थानिक यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. टाटा पॉवर, मुळशी धरणचे प्रतिनिधी सुरेश कोंडूभैरी यांनी ही माहिती प्रसिद्ध केली असून, तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने परिसरात आणखी पावसाची शक्यता वर्तविल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आवश्यकतेनुसार पाण्याच्या विसर्गात बदल करण्यात येणार असून, नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.











