पवनचक्क्यांमधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा वाशी पोलिसांनी पर्दाफाश केला असून सुमारे ४३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राञी उशीरा पर्यत सुरु होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवार (ता.१२) रोजी सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून चोरीस गेलेला कॉपर केबलचा साठा मौजे वाशी शिवारातील गट क्रमांक २७९ ब येथील शेतात लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बिट अंमलदार के.एस.बोरकर,पोलीस अंमलदार शेळके यांनी खात्री करून पथकासह छापा टाकला.
छाप्यात ५३ बंडल अंदाजे १,५०० किलो कॉपर केबल जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे १७ लाख १० हजार रुपये आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला एमएच १२ सीएच ५२९० क्रमांकाचा ट्रक अंदाजे किमंत २५ लाख रुपये व एमएच २५ बीडी ५५३८ क्रमांकाची दुचाकी अंदाजे किमंत एक लाख २५ हजार रुपये जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४३ लाख ३५ हजार रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासात संबंधित टोळी गेल्या दोन वर्षांपासून वाशी तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांत सक्रिय असल्याचा संशय आहे. या प्रकरणी राजेंद्र काळे, माणिक काळे, दया काळे (रा. कासारखानी), रामा उर्फ शेंडी काळे, बबलू शिंदे (रा. तेरखेडा) व सचिन शिंदे (रा. इटकूर, ता. कळंब) यांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगीतले.
सदर कारवाई कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले,पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार कपिल बोरकर, राम शेळके, विठ्ठल मलंगनेर, गोपीनाथ पवार,नसीर सय्यद यांच्या पथकाने केली.











