जवाहरनगर सरनाईक वसाहतीत खेळायला गेलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. इजान अक्रम बारगीर असे मृत मुलाचे नाव असून तो कुटुंबातील एकुलता एक होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बारगीर कुटुंबाच्या घराजवळच काही महिन्यांपूर्वी बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. परिसरात उर्दू माध्यमाची शाळा तसेच वस्ती असूनही हा खड्डा दीर्घकाळ उघडाच आणि संरक्षक उपायांशिवाय ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इजान घराबाहेर खेळण्यासाठी गेला. तो नेहमीप्रमाणे परिसरातच खेळत असल्याने आई-वडील आपल्या कामात व्यस्त होते. मात्र बराच वेळ उलटूनही इजान घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला.
परिसरातील धार्मिक स्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले असता इजान त्या खड्ड्याजवळ जाताना दिसला. त्यानंतर तो परतताना दिसत नसल्याने संशय वाढला. तत्काळ खड्ड्यात पाहणी केली असता इजान मृतावस्थेत आढळून आला. ही बाब समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
इजानचे वडील वखारीत काम करतात. एकुलत्या मुलाच्या आकस्मिक मृत्यूने बारगीर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, रहिवाशांकडून परिसरातील उघडे खड्डे व धोकादायक ठिकाणांबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. निष्काळजीपणामुळे निरपराध बालकाचा जीव गेला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.











