सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान देशातील काही बेरोजगार तरुण झुरळाप्रमाणे असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
त्यांच्या या विधानानंतर देशात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही व्यंगात्मक राजकीय चळवळ जन्माला आली. अवघ्या ३ ते ४ दिवसांतच १ कोटींपेक्षा जास्त तरुणांनी या चळवळीत सहभाग नोंदवला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचा उद्देश नेमकं काय आहे? कॉक्रोच जनता पार्टीचं राजकीय पक्षात रुपांतर होईल का? भविष्यात ही पार्टी निवडणुका लढवेल का? कॉक्रोच जनता पार्टीची कल्पना समोर कशी आली? याबाबत आता संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरात आणि सोशल मीडियावर फक्त कॉक्रोच जनता पार्टीचीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चळवळीसाठी कोणी फंडिंग करतंय का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच आता स्वत: अभिजीत दिपके यांनी लोकसत्ताच्या मुलाखतीत बोलताना मोठा खुलासा केला आहे.
आजचा तरुण ‘कॉक्रोच जनता पार्टी’कडे एवढा आकर्षित का होत आहे? या प्रश्नावर बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटलं की, “आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की, सध्याचं सरकार एवढं असंवेदनशील झालं आहे की लोकांच्या गरजा, लोकांच्या समस्यांकडे पाहायला सरकारला वेळ नाही. सध्याचं संपूर्ण राजकारण पाहिलं तर राजकारणात असा एकही पक्ष नाही, जो पक्ष ‘झेन-जी’ तरुणांबाबत बोलेल. सध्या एकही राजकारणी व्यक्ती असा नाही, जो २० ते २५ वर्षांच्या तरुणांबाबत बोलत आहे. कारण ‘झेन-जी’च्या समस्या, त्यांच्या गरजा काय आहेत? त्यांचं म्हणणं काय? हे समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. त्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांनी स्वत:ची चळवळ सुरू केली. कारण जर तुम्ही आमचं काही ऐकणार नसाल, तर आम्ही आमचंच राजकारण सुरू करू, आम्ही एकत्र येऊ, तेव्हा तुम्हाला आमचं ऐकावंच लागेलं”, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ला कोणाकडून फंडिंग मिळतंय का? कारण याबाबत आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? असं विचारलं असता अभिजीत दिपके म्हणाले की, “मला तर यावर हसायला येत आहे. कारण जर मला फंडिंग मिळालं असतं तर मी सर्वात आधी माझं शैक्षणिक लोन क्लिअर केलं असतं. कारण मी शैक्षणिक लोन घेऊन अमेरिकेत आलेलो आहे”, असं म्हणत अभिजीत दिपके यांनी फंडिंगबाबतचे सर्व आरोप फेटाळून लावले.
“खरं म्हणजे आपण येथेच चुकतो. कारण जेव्हा लोकांचा एवढा राग निर्माण होतो, जेव्हा लोक एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येतात. आपल्याला लोकशाहीवर एवढाही भरोसा राहिलेला नाही की समजा कोणी पैसे न घेता संघटित होत आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत आपण पाहिलं की जर कोणी संघटित होत असेल तर त्याचा अर्थ कोणीतरी फंडिंग करत आहे, असा घेतला जातो. याआधी असं कधी झालं नाही का? जेव्हा भारत स्वातंत्र्याची लढाई लढत होता, तेव्हाही लोक एकत्रित आले होते, आणीबाणीच्या काळातही लोक एकत्रित आले होते”, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
तरुणांना आता एकत्रित येण्याची गरज आहे का? असा प्रश्न विचारला असता अभिजीत दिपके यांनी म्हटलं की, “हो, एकत्रित येण्याशिवाय तरुणांकडे पर्यायच राहिलेला नाही.”
‘कॉक्रोच जनता पार्टी’चं एका चळवळीत रुपांतर होताना दिसत आहे. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीचं राजकीय पक्षात रुपांतर होणार का? याबाबत अभिजीत दिपके यांनी म्हटलं की, “नक्कीच होईल. पण आत्ता त्याबाबत ठामपणे सांगणं थोडं अवघड आहे. कारण सर्वांनाच माहिती आहे की ही कॉक्रोच जनता पार्टी आम्ही कोणतंही नियोजन करून सुरू केलेली नव्हती.जर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ते वक्तव्य केलं नसतं, तर आज कदाचित हे घडलंही नसतं. आम्ही असा कोणताही प्लॅन करून काही केलं नव्हतं. पण अवघ्या ३ ते ४ दिवसांत १ कोटी पेक्षा जास्त लोकांनी आम्हाला फॉलो केलं आहे. त्यामुळे एवढ्या लोकांशी बोलून पुढील नियोजन करणं खूप अवघड आहे. तरीही आम्ही या लोकांशी बोलणार आहोत, लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत, लोकांची मतं काय आहेत? हे जाणून घेऊ. लोकांचा सध्याच्या व्यवस्थेवर आणि सरकारवर एवढा राग का आहे? यांची कारणं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जोपर्यंत लोकांच्या भावना आम्ही जाणून घेत नाहीत, तोपर्यंत पुढील काही नियोजन आम्हाला करता येणार नाही. लोकांच्या समस्या आणि लोकांच्या भावना काय आहेत? हे आम्ही जाणून घेऊ आणि त्यानंतर पुढे काय निर्णय घ्यायचा ते ठरवू”, असं अभिजीत दिपके यांनी सांगितलं आहे.
समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात अभिजीत दिपके या ३० वर्षीय तरुणाने केली आहे. मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला हा तरुण सध्या अमेरिकेच्या बोस्टन शहरात शिक्षण घेत आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीनंतर त्याने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने एक वेबसाईट तयार केली आणि इन्स्टाग्राम व एक्सवर खातेही उघडले. अत्यंत कमी कालावधीतच ही व्यंगात्मक राजकीय चळवळ संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली. ‘मिंट’च्या वृत्तानुसार, अभिजीतने पुण्यातून पत्रकारितेची पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. नुकतीच त्याने अमेरिकेतील ‘बोस्टन युनिव्हर्सिटी’मधून पब्लिक रिलेशन्स (जनसंपर्क) या विषयात उच्च शिक्षण पूर्ण केले. सध्या आपण नोकरीच्या शोधात असल्याचे अभिजीतने एका मुलाखतीत सांगितले.











