ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग शमवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलातील ४२ वर्षीय केंद्र अधिकारी सागर शिंदे आणि प्रभाग समिती कार्यालयामध्ये कार्यरत ५५ वर्षीय सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांचा या आगीत मृत्यू झाला.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सागर शिंदे यांना दोन महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. मात्र शिंदे यांच्या निधनानंतर या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ठाण्यातील बाळकुम हायलॅण्ड येथील गृहसंकुलामध्ये शिंदे कुटुंब राहत होते. शिंदे पाचपाखाडी येथील केंद्रामध्ये कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. शिंदे यांच्या पश्चात आई जयश्री, पत्नी माधुरी व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. शिंदे यांचे पार्थिव नितीन कंपनी येथील अग्निशमन केंद्रात आणण्यात आले. इथे लोकप्रतिनिधी, अग्निशमन अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली.
महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी शिंदे यांची आई आणि पत्नीचे महापौरांकडून सांत्वन करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीदेखील शिंदे यांना मानवंदना दिली.
काळू शंकर गाडेकर यांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांचे मूळ गावी गाडेकरवाडी, गंगापूर, आंबेगाव, जिल्हा पुणे येथे नेण्यात आले. गाडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
अतिक्रमणे, मार्केटमधील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रवेशद्वारावर कब्जा, स्थावर मालमत्ता विभागाच्या संगनमताने मार्केटभोवती उभारलेल्या बेकायदा टपऱ्यांमुळे आगीची दुर्घटना घडली, असा आरोप भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. या आगीची माहिती मिळताच वाघुले यांनी अग्निशमन दलाबरोबर संपर्क साधला होता.
फळे व भाजीपाला विक्रीसाठी असलेल्या या मार्केटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. काही समाजकंटकांकडून दहशतही पसरवली जात होती. प्रवेशद्वाराचा कब्जा बेकायदा फेरीवाल्यांनी घेतला होता. मार्केटच्या दोन बाजूंच्या भिंतीभोवती बेकायदा टपऱ्या टाकल्या गेल्या. या प्रकाराविरोधात सातत्याने महापालिका व स्थावर मालमत्ता विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आगीची दुर्घटना घडली, असा आरोप वाघुले यांनी केला.
मार्केटमधील मूळ विक्रेते अतिक्रमणांमुळे हैराण झाले होते. तसेच बेकायदा विक्रेत्यांकडून मार्केटमध्ये सामान ठेवले जात असल्याच्या तक्रारी होत्या. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ मार्च, २०२६ रोजी वाघुले यांनी तक्रारही केली होती. तसेच आगीचा धोकाही व्यक्त केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मार्केटमध्ये चार बाजूंपैकी दोन बाजू दुकानांमुळे बंद झाल्या. उर्वरित दोन भिंतींवर केवळ छोटी लोखंडी जाळी बसविण्यात आली. त्यामुळे हवा खेळती राहत नव्हती. दोन बाजू बंद असल्यामुळे आग धुमसत राहिली आणि आगीने रौद्र रूप धारण केले होते, असे वाघुले यांनी सांगितले.
गावदेवी मार्केटचे पुनर्वसन झाल्यानंतर सर्व १५५ गाळेधारकांना जागा देण्यात आली. असे असताना महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने फेरीवाला पावत्यांच्या आधारावर तीन फेरीवाल्यांना जागा मंजूर केली. त्यानंतर तीन टपऱ्यांना मंजुरी दिली होती. रातोरात दोन टपऱ्या आणण्यात आल्या होत्या. मात्र, वाघुले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटवले होते.











