June 5, 2026 6:01 am

सोसायट्यांना ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.जवळपास शहरातील आठशेहून अधिक सोसायट्यांना नोटीसा पाठविल्या जाणार आहेत.

वसई विरार शहरात गेल्या काही काळात वाढती लोकसंख्या आणि कचरा व्यवस्थापनेतील अनियमितता यामुळे शहर कचऱ्याच्या विळख्यात सापडू लागले आहे. त्यातच औद्योगिक वसाहती, गृहसंकुलातून निघणाऱ्या कचऱ्याचे स्थानिक स्तरावर वर्गीकरण होत नसल्याने क्षेपणभूमीवर कचऱ्याचे डोंगर तयार होऊ लागले आहेत. शहरात विविध ठिकाणच्या भागातून दैनंदिन जवळपास आठशे ते नऊशे मॅट्रिक टन इतका कचरा गोळा होत आहे. यासाठी १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालिकेने घनकचरा प्रकल्प सुरू केला होता. पण, आता तो प्रकल्पही अवघ्या काही महिन्यात ठप्प झाला आहे.

तर दुसरीकडे ओला व सुका कचरा याचे योग्यरित्या वर्गीकरण व्हावे यासाठी ठिकठिकाणी हिरव्या व निळ्या रंगाच्या कचराकुंड्या ही ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनाही ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण न करताच सर्व कचरा एकत्रित करून दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न महापालिकेसमोर उभा राहिला आहे.कचरा भूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना ओला व सुका अशा स्वरूपात कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक केले आहे.

यात २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेली संकुले तसेच दररोज १०० किलोहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना सोसायटीच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावून खतनिर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे. शहरातील नऊ प्रभागातील सर्व सोसायट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात ८५० इतक्या सोसायट्या आढळल्या आहेत. त्या सर्व सोसायट्यांना कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात यावी याबाबत सूचना केल्या जाणार आहेत असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले आहे.

पाच ते सहा वर्षांपूर्वी महापालिकेने गृहसंकुलांना ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता दूत व पालिकेचे इतर कर्मचारी गृह संकुलात जाऊन नागरिकांची बैठक घेतली होती. यावेळी केवळ ५० सोसायट्यांनीच पुढाकार घेऊन खतनिर्मिती प्रकल्प उभारले होते.

वसई विरार शहरात अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. मात्र त्या कचऱ्याचे वर्गीकरण जरी केले तरी त्याची विल्हेवाट व खतनिर्मिती करण्यासाठी आवारात जागाच नसल्याने अडचणी येत असल्याची तक्रार पालिकेकडे केली जात आहे. अशा ठिकाणी सामाजिक संस्थेच्या मदत घेऊन खतनिर्मितीसाठी प्रयत्न केले जातील असे महापालिकेने सांगितले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!