कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर झोपडपट्टीतील बेकायदा बांधकामांवर रेल्वेने बुलडोजर चालवला. आता वांद्रे स्थानकालगतच्या मोकळ्या झालेल्या जमिनीचा वापर पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी करणार आहे.मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीबाबत रेल्वे प्रशासनाने गेमचेजंर प्लॅन आखला आहे.
अनधिकृत ठरवलेल्या बांधकामावर बुलडोजर चालवल्यानंतर आता या रिकाम्या जागेवर वांद्रे रेल्वे स्थानक आणि वांद्रे टर्मिनसचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही स्थानकांना जोडून त्या ठिकाणी भव्य ‘इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स’ विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वे प्रशासनाने गुरुवारी केली. या अंतर्गत वांद्रे टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या थेट दुप्पट केली जाणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती दिली. २०१७ पासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर, अखेर न्यायालयाच्या परवानगीने ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या वांद्रे टर्मिनसवरून लांब पल्ल्याच्या २२ गाड्या धावतात. भविष्यात ही संख्या ४४ (दुप्पट) करण्याचा रेल्वेचा मानस आहे. वाढीव गाड्यांसाठी टर्मिनसवर नवीन प्लॅटफॉर्म्सची निर्मिती केली जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.
पुढील १५ ते २० वर्षांतील प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन सर्व अत्याधुनिक सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. मोकळ्या झालेल्या जागेचा वापर करून वांद्रे लोकल स्टेशन आणि वांद्रे टर्मिनस परस्परांना जोडले जातील, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होईल.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या १०० पात्र झोपड्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले. मात्र, या पात्र रहिवाशांचे पुनर्वसन नेमके कधी आणि कुठे केले जाणार? या कळीच्या प्रश्नावर पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास असमर्थता दर्शवल्याने पुनर्वसनाचा तिढा अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.
मुंबईतील रेल्वेच्या जमिनींना अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी रेल्वेने आता कंबर कसली आहे. वांद्रे येथील कारवाई ही केवळ सुरुवात असून, लवकरच बोरिवली आणि दहिसर रेल्वे स्थानका लगतच्या रेल्वेच्या जागेवरील बेकायदा झोपड्यांवरही अशीच धडक कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने या पत्रकार परिषदेत दिला आहे.











