May 13, 2026 11:15 pm

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या दुरुस्तीला मंजुरी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शिक्षण, विद्वत्ता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेले ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आता गळतीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या भव्य वास्तूला अवघ्या काही वर्षांतच गळती लागल्याचे समोर आल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर स्मारकाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी २ कोटी ६४ लाख रुपयांच्या खर्चास शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील दाखविण्यात आला. महापालिकेने ऐरोली सेक्टर-१५ येथे अडीच एकर जागेवर या स्मारकाचे काम २०११ मध्ये सुरू केले होते. विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि निधीविषयक कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता.

पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १ नोव्हेंबर २०१४ रोजी करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित कामे पूर्ण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेचे प्रतीक म्हणून स्मारकाच्या मुख्य इमारतीवर पेनाच्या निबसदृश आणि उमलत्या कमळाच्या आकाराचा सुमारे ५० मीटर उंच डोम उभारण्यात आला आहे. संपूर्ण वास्तूवर संगमरवरी आच्छादन आणि आकर्षक क्लॅडिंग करण्यात आले होते. स्मारकाच्या उभारणीवेळी ही वास्तू नवी मुंबईतील एक वैशिष्ट्यपूर्ण स्मारक म्हणून विकसित करण्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र उद्घाटनानंतर काही वर्षांतच पावसाळ्यात छत आणि भिंतींतून पाणी झिरपत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या. विशेषतः अंतर्गत भागांमध्ये ओलसरपणा वाढल्याने सजावटीच्या कामांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही भागांतील मार्बल आच्छादन आणि भिंतींवर ओलाव्याचे डाग दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या संरचनात्मक परीक्षणात इमारतीचा ‘सी-२ बी’ असा प्रवर्ग नमूद करण्यात आला असून तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

त्यानुसार जलरोधक प्रक्रिया, बाह्य भागातील दुरुस्ती आणि अंतर्गत भागांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.स्थायी समिती बैठकीत स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. प्रवेशद्वार परिसरात ब्राँझ धातूचे हत्ती, आकर्षक डिझाइन, विविध प्रतीकात्मक शिल्पे तसेच रंगरंगोटीची कामे करण्यात येणार आहेत. एकीकडे मूळ इमारतीला गळती लागल्याने दुरुस्तीची गरज निर्माण झाली असताना दुसरीकडे सुशोभीकरणाच्या कामांना प्राधान्य दिल्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांच्या जबाबदारीची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र बैठकीत दुरुस्ती प्रस्ताव मंजूर होत असताना मूळ बांधकामातील त्रुटींवर सविस्तर चर्चा न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या स्मारकाच्या टिकाऊपणाबाबत आता प्रश्न उपस्थित होत असून, केवळ दुरुस्ती न करता जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

स्मारकाच्या बांधकामादरम्यान तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केलेल्या पाहणीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यांनी प्रत्यक्ष दौऱ्यावेळी काही कामांच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली होती. ही वास्तू ‘ताजमहालासारखी टिकाऊ आणि दर्जेदार’ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्याचे त्या काळात सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर मूळ संरचनात्मक गुणवत्तेपेक्षा बाह्य सौंदर्यीकरण आणि मार्बलच्या कामांना अधिक प्राधान्य दिल्याची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. त्यामुळे जलरोधक प्रणाली आणि बांधकाम प्रक्रियेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!