सत्ताधाऱ्यांमध्ये नालेसफाईच्या पाहणी दौऱयावरून रुसव्या-फुगवे सुरू आहेत. दुसरीकडे मात्र नाल्यांची परिस्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे. घाटकोपरमधील लक्ष्मीनगरचा मुख्य नाला कचऱयाने तुडुंब भरला असून या नाल्याच्या सफाईला अद्याप सुरुवातही झालेली नाही.
हा नाला शहरातील विक्रोळी पार्क साईट, लक्ष्मीबाग, रमाबाई आंबेडकर नगर, मानखुर्द, शिवाजीनगर अशा विविध प्रभागांना जोडला गेला आहे. पावसाळय़ापूर्वी नाल्याची सफाई झाली नाही तर या भागांमध्ये पाणी तुंबण्याची भीती स्थानिकांनी वर्तवली आहे. त्यामुळे सत्ताधाऱयांनी मान-अपमान आणि पह्टोसेशनमध्ये व्यस्त राहण्याऐवजी नालेसफाईकडे लक्ष द्यावे, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.
नालेसफाईच्या पाहणी दौऱयावरून सध्या सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिंदे गटात जोरदार जुंपली आहे. महापौर रितू गावडे यांनी नालेसफाई पाहणी दौऱयाचे निमंत्रण दिले नाही, म्हणून उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून स्वतंत्र पाहणी दौऱयाचे आयोजन करण्यात आले. आपले व पक्षाचे अस्तित्व नागरिकांना दाखवण्यासाठी ही चढाओढ सुरू आहे. मात्र शहरातील काही मुख्य नाल्यांच्या साफसफाईकडे सत्ताधाऱयांसह प्रशासकीय अधिकाऱयांनीही दुर्लक्ष केलेले पाहायला मिळाले आहे. घाटकोपरमधील लक्ष्मीनगर येथील भल्यामोठय़ा नाल्याला रस्त्याचे स्वरूप आले असून तो तुडुंब भरला आहे. नाल्यात प्लॉस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि कचऱयाचा खच पडला असून तो नाला संपूर्णपणे झाकला गेला आहे. ही बाब लक्षात येताच शिवसेनेने घटनास्थळी धाव घेत ही बाब उघडकीस आणली. प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत शिवसेनेने या ठिकाणी धरणे आंदोलन करत आपला निषेधदेखील दर्शवला.
शिवसेना विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नाल्याची पाहणी करण्यात आली. मे महिन्याचे दोन आठवडे उलटले तरी अद्याप नालेसफाईला सुरुवात झाली नसल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. मे अखेरपर्यंत किंवा मान्सूनपूर्वी या नाल्याची सफाई झाली नाही तर आसपासच्या परिसरात पाणी घुसण्याची चिंता यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. उपविभागप्रमुख अजित गुजर, विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, संघटक प्रसाद कामतेकर, विजय चपटे, शाखाप्रमुख विशाल चावक, मयुरेश नामदास, उपविभागप्रमुख महेश जंगम, शिक्षकेतर सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, महिला आघाडीच्या नीलम कदम, पूनम परब, रचना सावंत, वृषाली चावक, रमेश सावंत, वसंत पाटील, गणेश डावखर, चंद्रकांत हळदणकर, युवासेनेचे लौकेश फेपडे, स्वप्नील म्हात्रे व मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.











