वसई पश्चिमेच्या सनसिटी गास रस्त्याच्या कडेला राडारोडा व कचरा आणून टाकला जात आहे. त्यासोबत त्या कचऱ्याला आगीही लावल्या जात असल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वसई पश्चिमेकडील सनसिटी गास रस्ता मोकळा व निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याशिवाय गास, सोपारा, निर्मळ, भुईगाव या भागात जाणारा रस्ता असल्याने अनेक प्रवासी या मार्गाचा वापर करतात. परंतु या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा व राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दिवसेंदिवस या कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने रस्त्याचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिठागराची मोकळी जागा असल्याने येथे शुद्ध हवा असते.त्यामुळे सकाळ संध्याकाळ याभागात नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. तर काही पोलीस भरतीसाठीच्या सरावासाठी तरुण – तरुणी या भागात येतात. मोकळ्या वातावरणामुळे नागरिकांना प्रसन्न वाटणारे ठिकाण आहे. परंतु आता याच रस्त्यावर पुन्हा एकदा कचरा, राडारोडा, आगी लावण्याचे प्रकार घडत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य तयार होऊ लागले आहे. या प्रकाराकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने दिवसेंदिवस हे प्रमाण वाढून मोकळा असलेल्या परिसराची कचाराभूमी होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले.
विशेषतः सायंकाळच्या सुमारास या रस्त्यालगत टाकून दिलेला कचरा पेटविला जातो. त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात धूर हा धुमसत असतो. त्याचा त्रास येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत कचरा टाकणारे व आगी लावणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
सनसिटीच्या रस्त्यावर कचरा व राडा रोडा टाकल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा ठिकाणी आता क्लीनअप मार्शल यांना सांगून गस्त घातली जाईल. कचरा टाकताना, आगी लावताना जे कोणी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे महापालिकेचे सहायक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) जितेंद्र नाईक यांनी सांगितले आहे.











