शिवसेनेतील बंड घडवून आणल्याचा दावा करणारे माजी मंत्री तानाजी सावंत आज स्वतःच्या घरातील बंडामुळे अडचणीत सापडले आहेत. पुतणे धनंजय सावंत यांची उघड बंडखोरी आणि दुसरीकडे भाजपकडून पुतणे पृथ्वीराज सावंत यांना मिळालेली उमेदवारी यामुळे सावंत कुटुंबातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्ये आणि परखड, आक्रमक बोलण्याच्या शैलीमुळे कायम चर्चेत राहणारे नेते आहेत. शिवसेनेतील बंड आपणच घडवून आणल्याचा दावा त्यांनी जाहीर सभांमध्ये ठामपणे केला होता. या बंडासाठी जवळपास दीडशे बैठका घेतल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं.
मात्र, शिवसेनेचं बंड यशस्वी करणारे तानाजी सावंत आपलं कुटुंब एकसंध ठेवण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. आधी अनिल सावंत, त्यानंतर शिवाजी सावंत, मग पृथ्वीराज सावंत आणि आता धनंजय सावंत एकामागोमाग एक सावंत कुटुंबीयांनीच तानाजी सावंत यांच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतल्याचं चित्र आहे. आक्रमक आणि वादग्रस्त भाषाशैलीमुळेच सावंत कुटुंबाची राजकीय वाताहात होत असल्याची चर्चा सुरू आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे शिवसेनेकडून धाराशिव लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते.
त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह ठाण्यात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. योग्य वेळी निर्णय घेऊ, असा शब्द त्यांना देण्यात आला होता. पुढे विधानसभा निवडणुकीतही धाराशिव कळंब मतदारसंघातून इच्छुक असतानाही चुलते तानाजी सावंत यांनी आपल्याला न्याय दिला नाही, अशी खंत धनंजय सावंत यांच्या मनात होती. त्याचाच उद्रेक आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने उघडपणे होताना दिसतो आहे. परंडा तालुक्यात जिथे स्वतः तानाजी सावंत आमदार आहेत, त्याच तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांवर उमेदवार देत धनंजय सावंत यांनी काकांसमोर थेट मोठं राजकीय आव्हान उभं केलं आहे.
विशेष म्हणजे, शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश अद्याप झालेला नसतानाही भाजपने त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत यांना थेट जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव गटातून पृथ्वीराज सावंत भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एका बाजुला प्रवेश रोखल्याचा आरोप आणि दुसऱ्या बाजुला मुलाला मिळालेली उमेदवारी या घडामोडींमुळे सावंत कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
एकीकडे परंडा तालुक्यात पुतण्या धनंजय सावंत यांची उघड बंडखोरी, तर दुसरीकडे माढा तालुक्यात भाजपकडून पुतण्या पृथ्वीराज सावंत यांना उमेदवारी या दुहेरी घडामोडींमुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांचं राजकीय गणित बिघडताना दिसतंय. पुतण्याचं हे बंड शमवण्यात तानाजी सावंत यशस्वी ठरणार का, की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काका पुतण्यातील ही दरी अधिक तीव्र होऊन राज्याला आणखी एक काका विरुद्ध पुतण्यातील असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.











