पुण्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध बुधवार पेठ सध्या एका वेगळ्याच आणि गंभीर कारणाने चर्चेत आली आहे. बेकायदेशीर कृत्य आणि मानवी तस्करीचे जाळे या भागात इतके पसरले आहे की, बुधवार पेठ आता भारताची मिनी ‘बांगलादेश’ बनतेय की काय, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे पोलीसांकडून सातत्याने होत असलेल्या छाप्यांमध्ये दर महिन्याला अनेक बांगलादेशी महिला, पुरुष आणि धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले जात आहे. गेल्या वर्षभरात बुधवार पेठेतून पकडलेल्या बांगलादेशींची संख्या ऐकली तर कोणाचेही डोळे चक्रावून जातील.
पोलिस तपासात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुण्याचा सुमित चव्हाण हा बनावट कागदपत्र तयार करण्याच्या या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. या बांगलादेशी नागरिकांना देशात बेकायदेशीरपणे आणून त्यांना थेट भारतीय नागरिकत्व भासवणारी बनावट पॅन कार्ड आणि इतर रहिवासी कागदपत्र तयार करून दिली जात आहेत. ही बनावट कागदपत्रे आसाम, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून तयार करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
देशात बेकायदेशीर प्रवेश केल्यानंतर या महिलांना थेट पुण्यात आणले जात नाही. दलाल प्रथम त्यांना बेंगलोर किंवा मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये ठेवतात आणि तिथून सुरक्षितपणे पुण्यात पोहोचवतात. यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यांमध्ये ठेवून या महिलांना जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले जाते. या आंतरराष्ट्रीय साखळीचा आणि दलालांचा पर्दाफाश करण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे.
पुणे पोलिसांनी अवैध स्थलांतरितांविरोधात राबवलेल्या मोहिमेची आकडेवारी पाहिल्यास या समस्येची भीषणता लक्षात येते अकरा महिन्यांत १०३ बांगलादेशी नागरिकांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. २८ एप्रिलपर्यंत झालेल्या कारवाई: एकट्या बुधवार पेठेतून २८ एप्रिलपर्यंत ३६ बांगलादेशी महिलांना पकडण्यात आले आहे.
अवैध स्थलांतरित भारतात राहण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधत आहेत. आंबेगाव पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत एका महिलेकडे भारतीय ओळखपत्रांसोबतच बांगलादेशी कागदपत्रेही सापडली. या महिलेने एका भारतीय व्यक्तीशी विवाह केला होता आणि लग्नानंतर ती दोनवेळा बांगलादेशात जाऊनही आली होती.
तसेच, हे नागरिक पोलिसांच्या रडारपासून वाचण्यासाठी बांगलादेश मध्ये कॉल करताना सामान्य कॉलिंग ऐवजी मोबाईलमधील एका विशिष्ट गुप्त ॲपचा वापर करत होते. या ॲपद्वारे ते बांगलादेशातील आपल्या नातेवाईकांच्या आणि एजंट्सच्या संपर्कात होते. पुणे पोलिस आता या जप्त केलेल्या मोबाईलची सखोल तपासणी करत असून, यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या थेट सूचनेनुसार, पुणे पोलिसांनी शहराच्या विविध भागात तपास मोहीम आणि कागदपत्र पडताळणीची संयुक्त मोहीम तीव्र केली आहे. मानवी तस्करी आणि देहविक्रीच्या या काळ्या बाजाराला मुळापासून उपटून टाकण्यासाठी आणि एजंट्सची साखळी मोडीत काढण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक युद्धपातळीवर काम करत आहे.











