महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात स्कार्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. शेवटचा मृतदेह रात्री 8 वाजता दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आणि तब्बल 22 तासांनी रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे.
रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान ट्रेकर्संना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाडच्या सिस्केप टीमने हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं.
आंबेनळी घाटात एक स्कार्पिओ गाडी दरीत कोसळलीअसल्याचा मेसेज महाबळेश्वर ट्रेकर्सला काल रविवारी रात्री पावणेदहा वाजता मिळाला. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिकेत वागदरे, सोमनाथ वागदरे, संकेत सावंत हे घटनास्थळाकडे रवाना झाले. आंबेनळी घाटातील एका ठिकाणी टॉर्च मारला असता संशयास्पद परिस्थिती दिसली. बाकी सदस्यांना बोलावून घेण्यात आलं. काही वेळात टीमचे सदस्य साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले.
ट्रेकर्संनी सेटअप तयार करून रोपच्या सहाय्याने दरीत उतरायला सुरुवात केली. खाली पोहोचल्यानंतर एक गाडी दिसली. ती पुर्वीच्या अपघातातील होती. मग दुसऱ्या बाजूने पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत महाडची सिस्केप टीमही मदतीसाठी दाखल झाली. एका ठिकाणी महाबळेश्वर ट्रेकर्संचे सदस्य कुमार भाऊ शिंदे, अनिकेत वागदरे यांना एक बोर्ड वाकल्यासारखा दिसून आला. तसेच वाकलेल्या झाडामुळे गाडी इथूनच दरीत कोसळल्याचा संशय बळावला.
थोड्याच अंतरावर गाडीचा आरसा, मोबाईल दिसला. अपघाताचं ठिकाण निश्चित झाल्यानंतर ट्रेकर्स दरीत उतरले. त्यांना पहिल्यांदा दोन मृतदेह दिसले. निम्म्या सदस्यांनी दाभिळ गावाकडून शोध मोहीम सुरू केली. ज्याठिकाणी गाडी कोसळली होती, त्या ठिकाणी सर्व मृतदेह अस्ताव्यस्त पडले होते. झाडावरील मधमाश्यांचे पोळे आणि निसरड्या वाटेमुळे शोध कार्यात अडथळे येत होते.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सलग 22 तास शोध मोहीम राबवत सर्व 8 जणांचे मृतदेह दरीतून वर काढले. आंबेनळी घाटातील हे रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, सिस्केप टीम महाड, एसव्हीआरएसएस टीम कोलाड या टीमच्या सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, सुनील केळगणे, जयवंत बिरामणे, अमित कोळी, सुजित कोळी, सोमनाथ वागदरे, सौरभ गोळे, सौरव सालेकर, अक्षय नाविलकर, कुमार शिंदे, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, आदित्य रांजणे, भाऊ सपकाळ, सूर्यकांत शिंदे, अनिल लांगी, प्रज्वल केळगणे, अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, संकेत सावंत, मुन्ना उतेकर, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, मयूर जाधव, ओमकार सोनावणे, निखिल सावंत यांचा बचाव मोहिमेत सहभाग होता.











