May 29, 2026 2:35 am

रांजणगाव खुरी उरुसात अवकाळी पावसाचा कहर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या हजरत शहा सिकंदर बाबा यांच्या उरुसादरम्यान शनिवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले.

काही क्षणांतच संपूर्ण यात्रा परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी स्टॉल, रहाट पाळणे, खेळणी व तंबू कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

दुपारच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की दर्गा परिसरात उभारण्यात आलेले अनेक स्टॉल हवेत उडून गेले. काही ठिकाणी लोखंडी पत्र्यांचे तंबू कोसळले, तर यात्रेसाठी उभारण्यात आलेले रहाट पाळणे आणि खेळणी जमिनीवर आडवे झाल्याचे भीषण चित्र पाहायला मिळाले.

अचानक आलेल्या या संकटामुळे यात्रेत आलेल्या भाविकांची मोठी धावपळ उडाली. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. पावसामुळे व्यापाऱ्यांचा माल भिजून खराब झाला असून, अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील लहान व्यापाऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने स्टॉल उभारले होते. मात्र काही मिनिटांच्या वादळाने त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

यात्रा परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रहाट पाळणे कोसळल्याने उपस्थितांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

अवकाळी पावसामुळे उरुसातील अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थ व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे रांजणगाव खुरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, यात्रेचे आनंदमय वातावरण काही क्षणांतच चिंतेत बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!