सिंहगड घाटात शनिवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास दुचाकी संरक्षक कठड्याला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली तरुणी थेट दरीत कोसळली, तर चालक गंभीर जखमी अवस्थेत कठड्यालगत पडला.
वनसमितीच्या स्थानिक सुरक्षारक्षकांच्या तत्परतेमुळे दोघांचेही प्राण वाचले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाण आणि सौरभ पासलकर अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच वनसंरक्षण समितीचे शांताराम लांघे, तानाजी खाटपे, अमित जरांडे, संदीप सांबरे, भानुदास जोरकर, धनराज सांबरे, निलेश सांगळे यांच्यासह कुसगावचे अविनाश मांजरे आणि आतकरवाडी येथील सुरेश सांगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुरक्षारक्षकांनी मोठ्या धाडसाने दरीत उतरून जखमी तरुणीला दरीतून रस्त्यावर आणले.
दरम्यान, वनविभागाचे समाधान पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला तसेच हवेली पोलिसांना घटनेची माहिती दिली. हवेली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनाही घटनेबाबत कळविण्यात आले.
माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख तानाजी भोसले आणि खानापूरचे पोलिस पाटील गणेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र, रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब होत असल्याने जखमींना कोणतीही वेळ न दवडता आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातात पूजा चव्हाण हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक तपासणीत तिचा पाय दोन ते तीन ठिकाणी मोडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर सौरभ पासलकर याच्या डोक्याला गंभीर मार लागून नाक आणि कानातून रक्तस्त्राव होत होता. पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या विनंतीनुसार पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
हवेली पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिक, वनसमितीचे सुरक्षारक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.











