June 5, 2026 7:37 am

बंदघरात विवाहितेची हत्या करत होता पती, तेवढ्यात दार वाजलं अन्

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पोलिसांनी तत्परता दाखवली तर मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या व्यक्तीचाही जीव वाचू शकतो, याचा एक थरारक प्रत्यय नागपुरात आला आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस पथकाने दाखवलेल्या कमालीच्या समयसुचकतेमुळे एका विवाहितेची तिच्याच पतीकडून होणारी निर्घृण हत्या टळली आहे.मध्यरात्रीच्या वेळी घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही खळबळजनक घटना २१ मेच्या रात्री साधारणतः १२ च्या सुमारास घडली. गोठलपांजरी परिसरात बेलतरोडी पोलीस पथक नेहमीप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर होते. याच दरम्यान, एका ज्येष्ठ व्यक्तीने अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांच्या वाहनाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा घरात आतून कडी लावून त्यांच्या सुनेवर चाकूने जीवघेणा हल्ला करत होता.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गस्तीवरील पथकाने तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता उपनिरीक्षक नारायण घोडके आणि पोलीस शिपाई रितेश गोतमारे यांना तत्काळ घटनास्थळ गाठण्याचे आदेश दिले.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता आणि आतून महिलेचा ओरडण्याचा आवाज येत होता. महिलेचा जीव धोक्यात असल्याचे पाहून पोलिसांनी कोणताही विचार न करता तत्काळ दरवाजा तोडला. आत शिरताच पोलिसांना धक्कादायक दृश्य दिसले. ऋषिकेश सुरेंद्र वानखेडे (वय २२) हा तरुण त्याची पत्नी आश्लेषा वानखेडे (वय २५) हिच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत होता.

पोलीस पथकाने जीवाची पर्वा न करता तत्काळ आरोपीला झडप घालून जेरबंद केले आणि त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. या गंभीर प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश वानखेडेविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू वर्षात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही, हा रेकॉर्ड पोलिसांनी या तत्परतेमुळे कायम राखला.

या हल्ल्यात आश्लेषा वानखेडे गंभीर जखमी झाली होती आणि तिचा प्रचंड रक्तस्त्राव होत होता. पोलीस पथकाने कोणत्याही रुग्णवाहिकेची न वाट पाहता तत्काळ गस्तीवरील गाडीने महिलेला ‘एम्स’ रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.

पोलीस वाहनाने मध्यरात्री ९.३ किलोमीटरचे अंतर अवघ्या १५ मिनिटांत कापले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी आधीच समन्वय साधला होता. त्यामुळे महिला रुग्णालयात पोहोचताच तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. वेळेवर मिळालेल्या या वैद्यकीय उपचारांमुळेच तिचा जीव वाचला असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!