नीट पेपरफुटी प्रकरणातून लातूरमधील एक भयानक वास्तव समोर आलं आहे. एका बाजूला पैसे देऊन पेपर फोडत मेडिकलमध्ये प्रवेश मिळवणारे विद्यार्थी तर दुसऱ्या बाजूला विश्वजीत तेलंगे स्वतःचं आयुष्य पणाला लावून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होता.
विश्वजीत तेलंगे डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन गेली तीन वर्षे तो सातत्याने NEET परीक्षेची तयारी करत आहे. तीन वेळा त्याने परीक्षा दिली. मात्र प्रत्येक वेळी काही गुणांनी वैद्यकीय प्रवेश हुकला आणि यंदा पुन्हा पेपरफुटीच्या आरोपांनी त्याचं स्वप्न हादरलं.
सततचा अभ्यास, ताण आणि संघर्ष यामुळे त्याचं शरीर अक्षरशः खंगून गेलं. दोन्ही किडनी निकामी झाल्या. परिस्थिती इतकी गंभीर झाली की आजींनी स्वतःची किडनी दान करून त्याला नवं आयुष्य दिलं. उपचार सुरू असतानाही विश्वजीतने अभ्यास सोडला नाही. हॉस्पिटल, औषधं, डायलिसिस आणि अभ्यास यांच्यात तो झुंज देत राहिला. कारण त्याच्या डोळ्यांसमोर डॉक्टर बनण्याचंएकच ध्येय होतं. पण दुसरीकडे काही जण पैसे देऊन पेपर विकत घेत असल्याच्या प्रकारामुळे मेहनती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत. विश्वजीतसारखा विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करूनही काही गुणांनी मागे पडतो आणि पेपरफुटीसारख्या प्रकारांमुळे त्याची स्पर्धाच अन्यायकारक बनते. पैसे देऊन गुणवत्ता विकत घेणाऱ्यांमुळे आमच्या मुलाची गुणवत्ता कमी ठरते. अशी वेदना त्याच्या कुटुंबीयांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवते.
विश्वजीतचे वडील छोटंसं किराणा दुकान चालवतात. आई प्राथमिक शिक्षिका आहे. किडनी प्रत्यारोपण आणि उपचारांवर मोठा खर्च झाल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं आहे. तरीही त्यांनी मुलाचं स्वप्न मरू दिलं नाही. पुन्हा एकदा विश्वजीतने कंबर कसली आहे. पुन्हा NEET ची तयारी सुरू केली आहे. डॉक्टर होणारच हा निर्धार त्याने कायम ठेवला आहे. आता विश्वजीतच्या वडिलांची शासनाकडे एकच मागणी आहे. शारीरिकदृष्ट्या गंभीर आजारातून गेलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत विशेष सवलत द्यावी. काही गुण कमी पडले तरी विश्वजीतसारख्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी. माझ्या मुलाचं शरीर जरी जखमी झालं असलं तरी तो समाजासाठी राबेल, लोकांची सेवा करेल, डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं,अशी भावनिक अपेक्षा विश्वजीतच्या वडिलांनी व्यक्त केली. एका बाजूला पैशाच्या जोरावर गुणवत्ता विकत घेण्याचा आरोप…तर दुसऱ्या बाजूला मृत्यूशी झुंज देत स्वप्न जपणारा विश्वजीत…लातूरच्या शिक्षण व्यवस्थेतील ही दोन चित्रं आज अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.











