June 5, 2026 6:50 am

कोकणात रिलायन्स, अदानी अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

केंद्र सरकारने अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांना मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अलीकडेच केलेल्या ‘शांती कायद्या’ नुसार अदानी आणि रिलायन्स उद्योग समूह राज्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहेत.कोकणात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार मंगळवारी करण्यात आले.

राज्याची वीज निर्मितीची क्षमता वाढविण्यासाठी तसेच स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने रिलायन्स, अदानी, बजाज आदी उद्योग समुहासोबत सुमारे २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीसाठी सामंजस्य करार केले. अदानी कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे तर रिलायन्स कंपनी पूर्णागड( रत्नागिरी) येथे तर एनटीपीसी देवगड येथे अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणार आहे.

या कंपन्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून जवळपास एक लाख २३ हजा रोजगार निर्मिती होणार आहे. अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना सरकारच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी यावेळी दिली.

देशाच्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल घडवूण आणण्यासाठी केंद्र सरकारने काही महिन्यापूर्वीच शांती कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून सन २०४७ पर्यंत देशात १०० गिगावॅट इतकी अणुऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी या क्षेत्रात सार्वजनिक आणि खाजगी संस्थांना अनुऊर्जा प्रकल्प उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातही अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पांना सर्वप्रकारचे साह्य करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेनंतर अदानी पाॅवर कंपनी, एनटीपीसीएल (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपुर पाॅवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) या चार कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारने आज या कंपन्यांसी सामंजस्य करार केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

राज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीतून राज्य ऊर्जा निर्मितीमध्ये अधिक वेगाने प्रगती करणार आहे. ही गुंतवणूक केवळ ऊर्जा निर्मितीसाठीच लाभाची नसून त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र नेहमी देशात अग्रेसर असेल असा दावा फडणवीस यांनी केला. कंपन्यांनी सामंजस्य करार प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. संबंधित कंपन्यांनी प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण करावे. सरकार त्यांना संपूर्ण सहकार्य करेल असेही फडणवीस यांनी सांगितले.

अदानी पॉवर लिमिटेड कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे ६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारणार असून त्यासाठी १ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यातून या भागात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या १२ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज रत्नागिरी जिह्यातील पूर्णगड येथे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामधून ७ हजार २०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती व एक लाखाच्यावर रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच एनटीपीसी लिमिटेड खेड तालुक्यातील देवघर येथे १ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. यामध्ये ५ हजार रोजगार निर्मिती होईल. ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामधून पाच हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि ३ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. अशाप्रकारे राज्यात एकूण ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून २५ हजार ४०० मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

या सामंजस्य कराराच्या वेळी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिजनेसचे अध्यक्ष रंजय शरण आदी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!