June 5, 2026 6:03 am

महाराष्ट्रातील कंपनीची आंध्र प्रदेशात उडी!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील कंपनीने आता थेट आंध्र प्रदेशात व्यवसाय विस्ताराचे मोठे पाऊल उचलले आहे. पुण्यात मुख्यालय असलेल्या ‘भारत फोर्ज लिमिटेड’च्या संरक्षण क्षेत्रातील व्यवसायाशी संबंधित ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या ‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स लिमिटेड’ने आंध्र प्रदेशात नवा संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.श्री सत्यसाई जिल्ह्यात मदकसिराजवळ या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.

हा प्रकल्प एक हजाराहून अधिक एकरांवर उभारला जाणार असून, त्यात पुढील २ ते ४ वर्षांत सुमारे दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, उच्च-सुरक्षा चाचणीच्या पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या विशेष क्षमता लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे आधुनिक संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वाच्या प्रगत एनर्जेटिक्स आणि दारुगोळा प्रणालींमध्ये भारताच्या स्वदेशी क्षमतांना मोठी चालना मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे सुमारे ८०० जणांना थेट रोजगार मिळण्याची, तर अंदाजे २ हजार ५०० अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळण्यासोबतच अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून आंध्र प्रदेशचे स्थान आणखी बळकट होणार आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या विशेष साहित्याच्या (एनर्जेटिक्स) आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स’ची स्थापना करण्यात आली आहे. स्वदेशी पातळीवर रचना केलेली, विकसित केलेली आणि जागतिक मानकांनुसार तयार केलेली उत्पादने उपलब्ध करून देणे हा या कंपनीचा उद्देश आहे. हा उपक्रम आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी सुसंगत असून, आयातीसाठी पर्याय निर्माण करणे, स्थानिक मूल्यनिर्मिती वाढवणे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या साहित्यांमध्ये तांत्रिक स्वावलंबन साध्य करणे यावर त्याचा भर आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!