मुस्लिम बांधवांचा ‘बकरी ईद’ हा सण यंदा दिनांक २७ किंवा २८ मे रोजी साजरा होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा, सुव्यवस्था आणि स्वच्छता राखण्यासाठी मालेगाव महानगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली.
मनपा आयुक्त रवींद्र जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत आयुक्त जाधव यांनी जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली.
रस्त्यांवर किंवा अनधिकृत ठिकाणी कत्तल केल्यास रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे मोसम पात्रात आणि पर्यायाने गिरणा धरणात जाते. शहराला गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रक्तमिश्रित पाणी प्रदूषणाचा मुद्दा त्यामुळे नेहमीच वादाचा ठरत असतो. या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीरतेने घेत, महापालिकेने निश्चित केलेल्या जागांशिवाय अन्यत्र कुठेही बेकायदेशीर कत्तल केल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्तांनी बैठकीत दिला.
बकरी ईद सणासाठी जनावरांची कुर्बानी दिली जाते. कुर्बानी देताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने यंदा तात्पुरत्या कत्तलखान्यांची संख्या दुप्पट केली आहे. स.न. १०८ येथील एका कायमस्वरूपी कत्तलखान्यासोबतच शहरातील विविध २५ ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात येत आहेत. बकरी ईदसाठी यापूर्वी महापालिकेतर्फे साधारणत: १२ ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उभारले जात असे. नागरिकांनी केवळ २६ अधिकृत कत्तलखान्यातच कुर्बानी द्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
मुख्य नमाज पठण मैदानाची नीट साफसफाई करावी,ईदच्या काळात जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाहने सज्ज ठेवावीत, २५ तात्पुरत्या कत्तलखान्यांच्या ठिकाणी आणि मुख्य मार्गांवर पथदिव्यांची चोख व्यवस्था करावी,सण काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा,सर्व तात्पुरत्या कत्तलखान्यांमध्ये जनावरांची आरोग्य तपासणी करावी,अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
कुर्बानी दिल्यानंतर निर्माण होणारा कचरा महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणीच टाकावा. तसेच, तात्पुरत्या कत्तलखान्यापासून मांस वाहून नेताना ते कपड्याने व्यवस्थित झाकून न्यावे, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा व पोलीस प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस साहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल तसेच पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि मनपाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.











