देशभरात सध्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात आणि विशेषतः लातूरमध्ये वेगाने पोहोचले आहेत.
या प्रकरणात आता एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे पथक गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून होते. तीन दिवसांपूर्वीच सीबीआयने मोटेगावकर यांच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयावर छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर रविवारी दुपारी २ वाजल्यापासून शिवराज मोटेगावकर यांची कसून चौकशी सुरू होती. अखेर दीर्घ चौकशीनंतर सीबीआयने ही मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. शिवराज मोटेगावकर हे शैक्षणिक वर्तुळात मोठे नाव असून लातूर, पुणे आणि नांदेड येथे त्यांच्या आरसीसी क्लासेसच्या शाखा आहेत. ज्या शिक्षकाने २०२४ मध्ये पेपरफुटीनंतर लाखो विद्यार्थ्यांचा आवाज बनून न्यायाची मागणी केली होती, तोच शिक्षक आज स्वतः पेपर फुटीच्या आरोपाखाली गजाआड गेल्याने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने रविवारी (१७ मे) शिवराज मोटेगावकर यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. या झाडाझडती दरम्यान मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये ‘नीट’ परीक्षेची लीक झालेली प्रश्नपत्रिका आढळून आली. या भक्कम पुराव्याच्या आधारे सीबीआयने थेट कारवाई करत त्यांना अटक केली. २०२६ च्या ‘नीट’ पेपर फुटीच्या कटात त्यांचा थेट सहभाग असल्याचा संशय यंत्रणेला आहे.
मोटेगावकर यांच्या अटकेनंतर २०२४ मधील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. एका गाडीत बसून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओ संदेशात ते म्हणतात:
“आम्ही संभाजीनगर (औरंगाबाद) उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही ही याचिका केली आहे, कारण २०२४ च्या ‘नीट’ परीक्षेत खरोखरच खूप मोठा घोटाळा झाला आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. आज आम्ही मुंबईत आलो असून मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधीची सर्व माहिती गोळा करत आहोत. महाराष्ट्रातील सर्व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन या लढ्याला जनआंदोलनाचे रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुलांवर मोठा अन्याय होत असून, सर्वांनी यात साथ देणे गरजेचे आहे.”
प्रा. शिवराज मोटेगावकर हे लातूरमधील ‘रेणुका केमिस्ट्री क्लासेस’चे संचालक आणि महाराष्ट्रातील नामांकित शिक्षक आहेत. त्यांनी नांदेडमधून रसायनशास्त्र (Chemistry) विषयात पदव्युत्तर पदवी घेत अव्वल क्रमांक पटकावला होता. सुरुवातीच्या काळात नोकरी न मिळाल्याने त्यांनी घरगुती शिकवणी (ट्यूशन) घेण्यास सुरुवात केली, ज्याचे पुढे मोठ्या कोचिंग क्लासमध्ये रूपांतर झाले.
मोटेगावकर यांनी लातूरच्या पारंपारिक शिक्षण पद्धतीला कॉर्पोरेट स्वरूप दिले. त्यांनी केवळ रसायनशास्त्रच नव्हे, तर भौतिकशास्त्र (Physics) आणि जीवशास्त्र (Biology) हे विषयही एकाच छताखाली आणले. आज त्यांच्या कोचिंग ब्रँडचा विस्तार लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, अकोला, कोल्हापूर आणि नाशिक अशा अनेक शहरांमध्ये झाला आहे. त्यांच्या या मोठ्या शैक्षणिक साम्राज्यात शिक्षक, व्यवस्थापक आणि सुरक्षारक्षकांसह मोठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून, शिक्षकांना लाखांमध्ये वेतन दिले जाते.
गुणवत्तेच्या शर्यतीत जिथे लातूरमधील इतर क्लासेसमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शिक्षक शिकवत आहेत, तिथे मोटेगावकर हे कपाळाला टीळा लावणारा ‘मराठी चेहरा’ म्हणून ओळखले जातात. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले गेल्याने ते सध्या प्रचंड वादात सापडले असून, त्यांच्या शैक्षणिक साम्राज्याविषयी पालकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.











