राज्यभरात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांकडून वारंवार हल्ले होत आहे, अशातचबीड शहरात एका 6 वर्षीय वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कुत्र्याने हल्ला केला त्यावेळी शेजारच्या एका व्यक्तीने त्यांना हुसकून लावल्यामुळे चिमुकल्याचा जीव वाचला. अक्षरश: मोकाट कुत्र्याच्या टोळीने लहान चिमुकल्याला ओढून घेऊन जाताना दिसत आहे. पंधरा ते वीस फूट ओढून नेलं हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून मोकाट कुत्र्याचा नगरपालिकेनं बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
बीड शहरातील पंढरी नगरीमध्ये बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर खेळत असताना 6 वर्षीय राजवीर रविकुमार जायभाय या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. पण जवळच असलेल्या नागरिकांनी तात्काळ कुत्र्यांना हुसकून लावल्यानं पुढील अनर्थ टळला. या हल्ल्यात बालक जखमी झाले असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
“आमचा नातू दाराच्या समोर खेळत होता, खेळत असताना रस्त्यावरून जाात होता, त्यावेळी गाडीच्या मागून कुत्र्याची टोळी आली आणि त्यांनी राजवीरवर हल्ला केला. राजवीरने जीव वाचवण्यासाठी पळ काढला पण या कुत्र्यांनी अक्षरश: ओढत नेलं, आमचं नशीब चांगलं म्हणून बाळ वाचलं. आता इथे घाबरलेला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी चिमुरड्याचे आजोबा विलास जायभाये यांनी केला.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरामध्ये तब्बल 1233 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय. बीड शहरात बुधवारी कुत्र्याने चिमुरड्यावर हल्ला केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, असे तीन ते चार केसेस आठवड्याातून येत आहे, त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यातील एक जणाला सुट्टी झाली असल्याचं अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेश चव्हाण यांनी सांगितलं. पालकांनी आपल्या मुलाची काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे, त्या अनुषंगाने कुत्र्यांची निर्भीजन करण करणे आणि लसीकरण करणे यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. तसंच मोकाट कुत्र्यांना कुठेही खाऊ घालणाऱ्या व्यक्तीवर देखील कारवाई केली जाणार असल्याचं नगरपालिकेचं मुख्य अधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितलं. कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी शहरात स्वतंत्र जागा निर्माण केल्या आहेत.
मात्र, बीड शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून तात्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. या अगोदर मागील काही दिवसांत शहरातील पेठ बीड, पंढरी ,अंकुश नगर,बार्शी नाका,मोमीनपुरा, झमजम कॉलनी भागांत भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना आणि बालकांना चावा घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, एवढ्या घटना होऊनही नगरपालिका प्रशासनाकडून जुजबी उपायांचे आश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्ष मात्र कृती होत नसल्याने नागरिक संतापले आहेत. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच नगरपालिका जागी होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.










