उत्तर प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांत निसर्गाचे अत्यंत भयावह रूप पाहायला मिळाले. राज्याला धडकलेल्या भीषण वादळ आणि पावसामुळे आतापर्यंत तब्बल १०४ जणांचा मृत्यू झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.या आपत्तीमध्ये बरेली जिल्ह्यातील एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क हवेत उडताना दिसत आहे.
दैनिक जागरणच्या एका वृत्तानुसार , बरेलीच्या भमोरा भागातील ५० वर्षीय नन्हे खान यांचा हा व्हिडिओ आहे. एका लग्नासाठी उभारलेल्या तात्पुरत्या शेडचे खांब नन्हे खान यांनी धरून ठेवले होते. मात्र, वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, वाऱ्याने अख्खे पत्र्याचे शेड उखडले आणि त्यासोबत नन्हे खान यांनाही तो सुमारे ३०० मीटर वर हवेत उडवले आणि नंतर वेगाने जमिनीवर आदळले. सुदैवाने, या भीषण अपघातातून नन्हे खान वाचले आहेत, मात्र त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून ते सध्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, या वादळाचा सर्वाधिक फटका प्रयागराज जिल्ह्याला बसला असून तिथे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल मिर्झापूर १९, भदोही १४ आणि फतेहपूर ११ या जिल्ह्यांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. यात बळींची संख्या १०४ वर पोहचली आहे तर जखमींची संख्या ५२ वर पोहचली आहे.
तसेच ९८ घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि १३० पाळीव प्राण्यांचा मृत्यू सुध्दा या भयावह वादळात झाला आहे. झाडे पडणे, भिंती कोसळणे आणि अंगावर वीज पडल्याने बहुतांश मृत्यू झाले आहेत. एकट्या बरेलीत नन्हे खान वाचले असले, तरी एका १२ वर्षांच्या मुलीचा झाड अंगावर पडल्याने आणि ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा छतावरील लाकडी ओंडके अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे.
हवामान खात्याच्या (IMD) मते, हे वादळ ‘असामान्य’ होते. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी १०० किमी प्रतितास पेक्षा जास्त नोंदवला गेला. उत्तर प्रदेशच्या वायव्य भागात निर्माण झालेली चक्रीय स्थिती, राजस्थानकडून येणारे वारे आणि पश्चिमेकडून येणारे वारे यांच्या एकत्र येण्यामुळे हे संकट ओढवल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सर्व जिल्हा प्रशासनांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबांना २४ तासांच्या आत नुकसान भरपाई मिळावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. मदत आयुक्त कार्यालय २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे.










