जगात सुरु असलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे उर्जेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असताना परदेश प्रवास टाळा, खासगी वाहनांचा वापर टाळा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.त्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली होती. मोदींनी हे आवाहन करुन काही तासही उलटले नाहीत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच मोदींच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (11 मे) देशाला संबोधित करताना महत्त्वाचे आवाहन केले. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना त्यांनी इंधनाचा, खाद्यतेलाचा कमीत कमी वापर करावा, असे आवाहन केले होते. तसेच, सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा, शहरी भागात मेट्रोने प्रवास करावा असेही मोदींनी सांगितले होते. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई भाजपच्या अध्यक्षांनाच मोदींच्या या आवाहनाकड़े दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात तब्बल 25 गाड्यांचा ताफा वापरला गेला आणि त्यावरुनच विरोधकांनी टीकेची झोड उठवली. या मुद्द्यावर आमदार रोहित पवार आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केलीय.
मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत आज सकाळीच नालेसफाईच्या कामासाठी पाहणी दौरा केला. यावेळी, त्यांच्या स्वतःसाठीच्या दोन गाड्यांसह आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालेकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 25 गाड्यांचा ताफा संपूर्ण मुंबई उपनगरात फिरत असल्याचं दिसून आलं. त्यांच्या ताफ्यासोबत मोठा लवाजमाही पाहायला मिळाला, याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
खा. वर्षा गायकवाड यांनी या दौऱ्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला वर्षा गायकवाड यांनी लिहिले आहे “पंतप्रधान मोदीचे देशाल इंधन बचतीचे धडे देतात आणि दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम चक्क २५ गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहायला निघतात. साहेबांचा सल्ला फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का? जनतेला त्यागाचे सल्ले द्यायचे आणि स्वत: मात्र २५ गाड्यांच्या ताफ्यातून फिरायचे. मुंबई भाजप अध्यक्षांचा हा शाही नालेसफाई दौरा म्हणजे इंधनाची उधळपट्टी नाही का?की अमित साटम गटारातील गॅसवर गाड्या उडवत आहेत? लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण” पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा 25 गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद. कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात. भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशीच झालीय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावरही आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. आपण सगळेच पहिल्या दिवसापासून बोलत आहोत की, आजच्या परिस्थितीवर त्यांनी बोलावं. आता 5 राज्यातील निवडणूक झाल्यावर ते बोलत आहेत, त्यांच्या मंत्र्यांचा ताफा कमी करणार आहात का? जनतेने सर्व काही करावं तर सरकारने काय करावे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तर, अमित साटम यांनी 25 गाड्यांचा ताफा घेऊन पाहणी केली. त्यावरुन, आदित्य ठाकरेंनी त्यांना टोला लगावला. स्वतः सोबत 25 गाड्या आणि कचरा काढणाऱ्या गाड्या किती? असा सवाल आदित्य यांनी विचारला.











