उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या रायगड दौऱ्यातील सोमवारच्या एका प्रसंगाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. रोह्यातील भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी गाडीचे स्टेअरिंग हाती घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हेलिपॅडपर्यंत नेले.
यावेळी सुनेत्रा पवार वाहनाच्या पुढील सीटवर बसल्या होत्या. याबाबत विरोधकांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला आहे.
रोहा-अष्टमी नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि जनसंवाद कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी (११ मे) रोह्यात आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या हेलिपॅडकडे रवाना होत असताना त्यांच्या ताफ्यात शासकीय चालक उपस्थित असूनही अनिकेत तटकरे यांनी चालकाची भूमिका बजावली. काही वेळातच हा व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि राजकीय चर्चांना उधाण आले.
अनिकेत तटकरे यांनी चालकाची भूमिका बजावण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चिपळूण दौऱ्यात असताना अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या वाहनाचे स्टेअरिंग सांभाळले होते. त्या वेळीही विरोधकांनी सुरक्षा आणि शासकीय प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती. त्याचीच पुनरावृत्ती रायगडमध्ये घडली आहे.











