शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाताल लोक प्रकल्पांतर्गत ५६ किलोमीटरचे पाच बोगदे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका स्वतंत्र ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही) कंपनी स्थापन करणार असून, प्राथमिक अहवाल आठ दिवसांत राज्य सरकारला सादर केला जाईल.
विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भूमिगत रस्ते तयार करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) मुंबईत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या बैठकीत फडणवीस यांनी भूमिगत रस्ते तयार करण्यासाठी ‘एसपीव्ही’ स्थापन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या होत्या.
येरवडा ते कात्रजदरम्यान भुयारी मार्गासाठी अहवाल तयार करण्याचे काम यापूर्वी ‘पीएमआरडीए’कडे सोपविले होते. मात्र, आराखडा परिपूर्ण नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका प्रशासनास ‘पीएमआरडीए’ने केलेल्या भुयारी मार्गाच्या प्राथमिक आराखड्यानुसार पुढील अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, ”येरवड्यातील शास्त्रीनगर ते कोंढवा येथील खडीमशीन चौक, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते औंध मार्गे जगताप डेअरी चौक, खडकी ते शास्त्रीनगर चौक, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज् चौक आणि बाणेर पाषाण असे भुयारी मार्गाचे जाळे महापालिकेच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.”
३४ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमला जाईल. प्रकल्प मोठा असल्याने तो ‘पीपीपी’ तत्त्वावर राबविण्याचा विचार असून, प्रस्तावित ‘एसपीव्ही’मध्ये महापालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि वाहतूक तज्ज्ञांचा समावेश असेल. ‘पीएमआरडीए’च्या प्राथमिक आराखड्यानुसार महापालिका आता पुढील अंमलबजावणी करणार आहे.











