भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहराचे पहिले संस्थापक शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक गुलशन जग्गी (वय 80) यांचे पुणे इथं खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंड, असा परिवार आहे. काँग्रेस सत्ता काळात त्यांनी भाजपचे शहरात नेतृत्व करताना अनेक आंदोलन करत तुरूंगात जावे लागले होते.
अहिल्यानगर शहरात जनसंघापासून सक्रिय काम करत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) स्थापनेनंतर 1980 ते 85 या काळात गुलशन जग्गी हे, पक्षाचे पहिले शहराध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. प्रतिकूल परिस्थितीत शहरात भारतीय जनता पक्षाचे विचार रूजवत काम वाढवण्यात जग्गी यांनी बहुमोल योगदान दिले.
काँग्रेस (Congress)सत्ता काळ होता, संपर्काची साधने कमी असताना, नागरी प्रश्नांवर त्या काळात गुलशन जग्गी हे आक्रमक भूमिका घेत, यासाठी त्यांनी अनेक आंदोलने गाजवली. यातून त्यांना अनेकदा तुरूगांत देखील जावे लागले. या आक्रमक भूमिकेमुळे अहिल्याननगर शहरात त्यांचा मोठा दरारा निर्माण झाला होता.
भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या सारख्या अनेक दिग्गज राष्ट्रीय नेत्यांशी जग्गी यांचा थेट संपर्क असायचा. त्याकाळात गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याबरोबर अनेकदा त्यांनी एसटी व दुचाकीवर प्रवास करून पक्षाचे काम वाढवले.
गुलशन जग्गी हे बालपणी फाळणीच्या वेळेस कुटुंबासमवेत भारतात आले व अहिल्यानगरमध्ये स्थायिक झाले. तेलीखुंट इथल्या सायकल दुकानाचा व्यवसाय सांभाळून, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नि:स्वार्थपणे काम करून वाढवले. दोन वेळा नगरसेवक पद भूषवणारे गुलशन जग्गी यांनी शहर सरकारी बँकेचे संचालक म्हणूनही उत्कृष्ट काम केले होते.
राजकारणातील दांडग्या अनुभवामुळे ते अनेकांचे राजकीय गुरू होते. दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी, दामोदर बठेजा, वसंत लोढा, सुनील रामदासी यांच्या सारख्या अनेक नेत्यांना त्यांनी पक्षाचे सदस्य करून घडवले.











