May 15, 2026 5:15 am

धुळे-भुसावळ एसटीचा भीषण अपघात; ३ किमीपर्यंत प्रवाशांचा किंकाळ्यांचा आवाज

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

धुळ्याहून भुसावळकडे जाणाऱ्या एका एसटी बसला भीषण अपघात झाला असून, काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने सुमारे ३ किलोमीटरपर्यंत अनियंत्रित बस रस्त्यावर धावत होती.

या दरम्यान बसमधील ५० ते ६० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सुदैवाने, बस सुरक्षा कठड्याला धडकल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस पारोळा येथून निघाल्यानंतर एरंडोलजवळील धारागीर गावाजवळ पोहोचण्यापूर्वीच गाडीच्या मागील बाजूने मोठा ‘खळखळ’ आवाज येत होता. काही वेळातच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि समजले की बसचे ब्रेक फेल झाले आहेत. अनियंत्रित झालेली बस कधी रस्त्यावर तर कधी रस्त्याखाली जात होती. ही थरारक स्थिती सुमारे ३ किलोमीटरपर्यंत सुरू होती, ज्यामध्ये जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला.

बस अनियंत्रित असतानाच तिची काही चाके निखळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अखेर बस रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला जाऊन धडकली. या भीषण धडकेत बसचा चालक आणि वाहक (कंडक्टर) गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने धुळे येथे हलवण्यात आले आहे.

अपघातात जखमी झालेल्या १० ते १५ प्रवाशांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश प्रवाशांना मुका मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसटी महामंडळाकडून या तांत्रिक बिघाडाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र प्रवाशांनी बसच्या देखभालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!