बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या नागपूरमध्ये आहे. त्यांच्या वक्तव्याने वाद पेटला आहे. तर आता त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना थेट आव्हान दिले आहे.
आपण दोन दिवस दरबार लावणार आहोत. त्यात ज्यांना शंका असेल त्यांच्यासाठी बागेश्वर बाबांनी ओपन चॅलेंज दिले आहे. तर बागेश्वर बाबा हे ढोंगी आहेत. हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्यावर कोणताही देव प्रसन्न नाही. त्यांनी पत्रकारांसमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारावे असे प्रत्युत्तर श्याम मानव यांनी दिले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांना ललकारण्यात तर आले आहे, पण सामना होणार की? वायफळ बडबड रंगणार याकडे तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बागेश्वर बाबा सध्या रामकथा वाचणासाठी नागपूरमध्ये आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. “मी पाच दिवस इथे आहे,मध्य प्रदेशात नाही,रामकथा सुरू आहे. प्रदेश त्यांचा, मंच पण त्यांचा आहे. कुणाला काही खाज असेल तर त्यांनी यावे, दोन दिवस दरबार लागणार आहे. माझ्याजवळ जी विद्या आहे, जी शक्ती आहे त्याचे प्रस्तुत करणार. मी काही जादूगार नाही, ईश्वर जे प्रेरणा देते ती मी लोकांना मार्गदर्शन देतो. मी त्यांच्याकडे जाणार नाही. त्यांनी दरबारात यावे.” असे ओपन चॅलेंज त्यांनी श्याम मानव यांना दिले आहे.
यापूर्वी सुद्धा श्याम मानव यांनी 2023 मध्ये बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान दिले होते. तर असे दरबार, अंधश्रद्धा पसरवत असताना सरकार कारवाई करत नसल्याने टीका केली होती. त्यावर “30 तारखेला मी निघून जाणार, मग म्हणायचे नाही की बाबा पळून गेला. त्यांची आणि आमचीही झंझट खतम” असा बाबांनी टोला लगावला आहे. यापूर्वी श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि 80 लाख रुपयांचे बक्षीस जिंका, असे आव्हान दिले आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा नागपूरातील रेशीमबागेत रामकथेचा कार्यक्रम सुरू आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आव्हान दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी ते स्वीकारले आहे. त्यांनी बागेश्वर बाबांना पत्रकारांसमोर सर्वच दिव्य लीला दाखवण्याचे आवाहन केले आहे. बाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास 2023 मध्ये 30 लाख रुपयांचे बक्षीस होत ते आता 80 लाख रुपयाचं केलं आहे, अशी प्रतिक्रिया बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी दिलेल्या आव्हानानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी दिली आहे. दिव्य दरबारात प्रदर्शित झालेले व्हिडिओ याआधारावर त्यांना मानव यांनी चॅलेंज दिले आहे.
2023 मध्ये ज्या अटी आहेत त्याच आजही कायम असल्याचे मानव म्हणाले. पत्रकारासमोर बागेश्वर बाबांनी दहा लोकांना ओळखून किंवा जवळच्या रूममधील ठेवलेल्या वस्तू ओळखायचा आहेत. नाव, मोबाईल नंबर आणि एखाद्या भक्ताच्या घरातील कोणत्या वस्तू कुठे ठेवल्यात हे त्यांनी ओळखून दाखवायचे आहे. तर बाबांजवळ कोणतीही दिव्य शक्ती नाही. ते फक्त लोकांना फसवण्याचा काम करतात. 90 टक्के जरी वस्तू ओळखले तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू आणि आपले कायमस्वरूपी भक्त बनू असे श्याम मानव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता दोन दिवसात शड्डू ठोकलेले दोन्ही पहेलवान आमने-सामने येतात की एकमेकांना आव्हान या हवेतील गोष्टी ठरतात हे लगेच समोर येईल.











