पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्त्याची दुरवस्था सध्या हजारो नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांचा अक्षरशः श्वास गुदमरतो आहे.
एकीकडे पुणे-नाशिक, पुणे-नगर, हडपसर-सासवड या मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आजी-माजी खासदार, आमदार तसेच राजकीय पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. मात्र पुणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदार यांचे राजकीय वजन असतानाही पुणे-सोलापूर महामार्गावरील कोंडी सोडविण्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर गाडीतळ, शेवाळवाडी, कवडीपाट टोलनाका, थेऊर फाटा, नायगाव चौक, कोरेगाव मूळ फाटा तसेच उरुळी कांचन येथील कस्तुरी मंगल कार्यालयाजवळील वळण या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय महामार्गावरील रिफ्लेक्टर आणि जाळ्या तुटून धोकादायक अवस्थेत आहेत. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे सतत लहान-मोठे अपघात घडत आहेत. या अपघातांमध्ये काही नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
दरम्यान, हडपसर, १५ नंबर, मांजरी, शेवाळवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर फाटा, सोरतापवाडी, उरुळी कांचन ते दौंड तालुक्यातील सहजपूर, कासुर्डी, यवत, केडगाव, चौफुला, वरवंड आणि पाटस या परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे पाहून “खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी या महामार्गाची समस्या अधिकच जटिल बनत चालली आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे सर्व मंत्री पुणे जिल्ह्याचे आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची या मार्गावरून नेहमी ये-जा असते. तरीही या महामार्गाच्या समस्येकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येते.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील या महामार्गावरील अडचणी सोडविण्यासाठी अपेक्षित पुढाकार घेतलेला दिसत नाही. तसेच शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनीही या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याची टीका होत आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी हा राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंगरोडचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, “रिंगरोड होईल तेव्हा होईल; सध्याच्या समस्या आधी सोडवा,” अशी नागरिकांची मागणी आहे. या महामार्गाच्या प्रश्नावर आमदार राहुल कूल यांच्याव्यतिरिक्त इतर कोणताही लोकप्रतिनिधी ठोसपणे पुढे आल्याचे दिसून येत नाही, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे स्थानिक नागरिकांनी सध्या सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर लोणी काळभोर, उरुळी कांचन तसेच पूर्व हवेलीतील ग्रामस्थांनी आता आमदार कटके यांच्याकडे ठोस मागणी केली आहे. “वाघोलीप्रमाणेच आमच्या भागातील समस्या सोडवाव्यात,” पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि आम्हालाही मोकळा श्वास घेण्याची संधी द्यावी,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील समस्या सोडविण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कूल यांनी पुढाकार घेतला आहे. हडपसर ते यवत दरम्यानची वाहतूक कोंडी, नागरिकांना होणारा त्रास आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेऊन त्यांनी सहा पदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) उभारणीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत ५२६२.३६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पूर्व पुणे, हवेली आणि दौंड तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल, वाहतूक सुरळीत होईल आणि परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल.
वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे
• हडपसर गाडीतळ परिसरातील अतिक्रमणे
• दुकानांमधील प्रचंड गर्दी
• रस्त्यावरच अनियमित पार्किंग
• हातगाड्या व फेरीवाल्यांची वाढती संख्या
• मांजरी व परिसरातील उपबाजार
• कवडीपाट टोलनाका येथील भाजी मंडई
• महामार्गालगतच्या मंगल कार्यालयांची वाहने रस्त्यावर उभी राहणे
• रस्त्यालगत उभारलेल्या टपऱ्या
• रस्त्यावरील मोठे खड्डे
परिणामी, रस्ता उपलब्ध असूनही या सर्व कारणांमुळे वाहतूक सुरळीत न होता कोंडी निर्माण होत आहे.
उपाययोजना (वाहतूक कोंडी)
• महामार्गालगतच्या भाजी मंडई हलविणे
• परप्रांतीय टपऱ्या व अतिक्रमण हटविणे
• मंगल कार्यालयांना स्वतंत्र पार्किंगची सक्ती करणे
• कार्यालय चालक व मालकांना नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देणे
• चौकाचौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक
या उपाययोजना तातडीने राबवल्यास पुणे- सोलापूर महामार्गावरील कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.











