April 25, 2026 9:20 pm

घोडबंदर मार्गावर उलट्या दिशेने रिक्षा चालविणे पडले महागात!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्यभर रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्याचा मुद्दा गाजत असतानाच, घोडबंदर मार्गावर प्रवाशांना सोडण्यासाठी उलट्या दिशेने रिक्षा चालविणे एका परप्रांतीय मुजोर रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले आहे.

विरुद्ध दिशेने रिक्षा चालवत वाहतूक कोंडी निर्माण केली आणि लोकांशी वाद घातला, याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच बेशिस्त रिक्षा चालकांची खैर नाही, असा इशारा देत यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कृष्णा राकेश गुप्ता (२९) असे रिक्षाचालकाचे नाव असून तो कळवा खारेगाव येथील कावेरी हाईट्स परिसरात राहतो. त्याच्याविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गुप्ता या रिक्षाचालकाने गुरुवारी दुपारी ठाणे स्टेशनवरून घोडबंदर रोड पातलीपाडा येथे जाण्यासाठी शेअरिंग दोन प्रवाशी रिक्षात घेतले.

दरम्यान, एका प्रवाशी महिलेला पातलीपाडा उड्डाणपुलाखाली सोडायचे होते. मात्र, तो विसरला आणि उड्डाणपुलावरून रिक्षा घेऊन निघाला. महिला प्रवाशाने त्याला उड्डाण पुलाखाली सोडण्याची आठवण करून दिली. त्यानंतर त्याने रिक्षा थेट पुलावरून दामटवून पुढे नेली आणि त्यानंतर पुल उतरून त्याने पुलालगत असलेल्या रस्त्यावरून विरूद्ध दिशेने रिक्षा नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. या मुजोर रिक्षाचालकाला रस्त्यावरील अनेक वाहन चालकांनी समजावून सांगूनही तो रिक्षा मागे घेत नव्हता आणि त्यांच्याशी त्याने अरेरावी केली.

रिक्षा चालकाच्या या बेशिस्त वर्तणुकीची चित्रफित शुक्रवारी समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर ठाणे वाहतूक विभागाने त्या बेशिस्त रिक्षाचालकाचा छडा लावला. तसेच, या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे शहर वाहतूक विभागाने विरूद्ध दिशेने रिक्षा चालवल्याप्रकरणी कृष्णा राकेश गुप्ता याच्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रिक्षाच्या नंबरवरून कळवा येथे राहणाऱ्या रिक्षाचालक कृष्णा गुप्ता याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कासारवडवली वाहतूक उपविभाग येथील नेमणुकीतील पोलीस हवालदार दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२६ (२) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. दरम्यान, बेशिस्त रिक्षाचालकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!