April 25, 2026 9:20 pm

पुणे स्टेशनला मिळणार ६ नवीन प्लॅटफॉर्म

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणेरेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी, नवीन गाड्यांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरण करण्यात येत आहे. सध्या असलेल्या सहा प्लॅटफॉर्ममध्ये आता आणखी नवीन सहा फलाटांची भर पडणार असून, आता ११ आणि १२ या दोन प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरुवात झाली आहे.

यामुळे पुणे रेल्वेस्थानकाची क्षमता दुप्पट होणार असून, गाड्यांची होणारी ‘आउटर’ची प्रतीक्षा आता संपणार आहे.

पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, जागेच्या उपलब्धतेअभावी आणि मर्यादित प्लॅटफॉर्ममुळे नवीन गाड्या सुरू करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे स्थानकाची पाहणी करून सहा नवीन फलाट वाढवण्याचे आदेश वर्षभरापूर्वी दिले होते. त्यानुसार रेल्वे विभागाने आराखडा तयार केला असून, या संपूर्ण प्रकल्पासाठी ४४.०९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म ९ ते १२ दरम्यान ४०० मीटर लांबीचे ‘कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म’ उभारले जाणार आहे. यामुळे प्रवाशांना ऊन आणि पावसाचा त्रास होणार नाही. प्रत्येक फलाटावर आधुनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे १० वॉटर स्टँड्स आणि सर्व फलाटांना जोडणारे पादचारी पूल (एफओबी) उभारण्यात येणार आहेत. या विस्तारीकरणाचे काम पुढील एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

हे सर्व नवीन सहा फलाट ‘आयलँड’ स्वरूपाचे असणार आहेत. यामध्ये एकाच प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना गाड्या लागू शकतील. यामुळे प्रवाशांना चढणे आणि उतरणे अत्यंत सोपे होईल. तसेच, प्रवाशांची गर्दी विभागली गेल्यामुळे प्लॅटफॉर्मवर होणारी चेंगराचेंगरी कमी होण्यास मदत होईल. पहिला टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ११ आणि १२ चे काम सुरू केले आहे. यासाठी १५.३२ कोटी खर्च केले जाणार असून, ६०० मीटर लांब आणि १३ मीटर रुंद असे हे फलाट पुढील दोन महिन्यांत पूर्ण होतील. दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म ९ आणि १० साठी १८.३८ कोटी मंजूर झाले आहेत. हा ७५० मीटर लांबीचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म असेल, जिथे २४ डब्यांच्या रेल्वे सहज उभ्या राहू शकतील. तर तिसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म ७ आणि ८ साठी १०.३९ कोटींचा निधी असून, याची लांबी ६५० मीटर आणि रुंदी १० मीटर असणार आहे.

रेल्वेस्थानकावरील दृष्टिक्षेप :

– एकूण नवीन प्लॅटफॉर्म : ६ (एकूण संख्या १२ होणार)

– प्रकल्पाचा एकूण खर्च : ४४.०९ कोटी रुपये

– सर्वांत लांब प्लॅटफॉर्म : ७५० मीटर (प्लॅटफॉर्म क्र. ९ आणि १०)

– प्रवाशांना फायदा : २४ डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सहज थांबणार

– ४०० मीटरचे शेड, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर २ स्वच्छतागृहे आणि १० वॉटर स्टँड्स

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!